पालघर,
वसई पूर्व मुख्य रास्ता पाण्याखाली,रस्तावर खर्च झालेले लाखो रु.पाण्यात,
- वसई पूर्वेस मुंबई-अहमदाबद राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक दिवसभर अत्यंत धिम्यागतीने सुरू होती.
वसई ते सातीवली फाटा दरम्यान दरवर्षी गुढघाभर पाणी भरते.त्यामुळे सातीवली फाटा,गोखीवरे,सातीवली गाव,वालीव,गवराईपाडा,
भोयदापाडा हजारो नागरिकांना किमान चार ते पाच दिवस हालअपेष्टा सहन करावे लागते.या रस्त्याची उंची कमी असल्यामुळे पाण्याचा निचरा वेगाने होत नव्हता.याविषयी नागरिकांकडून अनेक तक्रारी आल्यानंतर महानगरपालिकेने रस्त्याची पुनर्बांधणी व रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला व एप्रिल व मे या दोन महिन्यात रस्त्याचे काम पूर्ण केले.त्यासाठी लाखो रु.चा निधी खर्ची पडला.पण हा खर्च पहिल्याच पावसात वाहून गेला आहे.गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने महानगरपालिकेची अब्रू चव्हाट्यावर आली.गेल्या दोन दिवसांपासून या रस्त्यावर गुडघाभर पाणी भरले असून वाहनचालकांना दिवसभर आपली वाहने जपून चालवायला लागत होती.या रस्त्याची पुनर्बांधणी अतिशय नियोजनशून्य पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.ठेकेदाराने पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग न ठेवल्यामुळे मूळ उद्देश सफल होऊ शकला नाही,असे त्यांचे म्हणणे आहे.अगदी तकलादू स्वरूपाचे बांधकाम झाले असून या ठेकेदारांची चौकशी करून त्याला काळ्या यादीत टाकण्यात यावे,अशा मागणीने जोर धरला आहे.

