दिपक मोहिते,
” हल्लाबोल,”
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उंदरांच्या पळापळीला येणार वेग,
राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे व शरद पवार यांचा वाढता प्रभाव व त्यांच्या गटाला नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मिळालेले घवघवीत यश,अशा दोन कारणांमुळे फडणवीस,शिंदे व अजित पवार या त्रिकूटाना घाम फुटला आहे.त्यामुळे त्यांचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आता माघारी फिरू लागले आहेत.अजित पवार गटाचे पुण्यातील १५ ते २० खंदे पदाधिकाऱ्यांनी नुकतेच शरद पवार यांचे बोट धरले.त्यामुळे अजित पवार यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.शिंदे व अजित पवार गटाचे अनेक आमदारही ” सुबहका भुला, शामको घर लौटा,” अशा भूमिकेत आले आहेत.
लोकसभा निवडणुकीत महायुतीचे पतन झाल्यानंतर महायुतीच्या घटक पक्षात चांगलीच धाकधूक सुरू झाली आहे.या निवडणुकीत पक्षाचे प्रमुख दस्तुरखुद्द अजित पवार यांना शरद पवार व सुप्रिया सुळे ,या दोघांनी त्यांच्या होमग्राऊंडवर कात्रजचा घाट दाखवल्यामुळे त्यांच्या पक्षातील आमदार भितीच्या सावटाखाली आले आहेत.आपल्या नेत्याची अवस्था अशी झाली तर आपले काय होईल ?अशा भितीने त्यांना ग्रासले आहे.लोकसभा निवडणुकीत भाजपने सर्व्हेच्या नावाखाली शिंदे व अजित पवार गटाला ज्या पद्धतीने दाबून टाकले,ते पाहून आमदारांचे धाबे दणाणले आहे.विधानसभा निवडणुकीच्या वेळीही भाजप पुन्हा तशीच खेळी करत अनेक घटक पक्षाच्या आमदारांना उमेदवारी नाकारण्याची शक्यता आहे.त्यामुळे अजित पवार यांनीही २८८ जागांवर आम्ही सर्व्हे करणार असल्याचे जाहीर केले आहे.मात्र अमित शहा व देवेंद्र फडणवीस,त्यांच्या या सर्व्हेला धूप घालणार नाहीत.विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या की शिंदे व अजित पवार गटाचे आमदार व पदाधिकारी यांचा ओघ उद्धव व पवार गटाकडे सुरू होईल.भाजप,सोबत असलेल्या घटक पक्षांना ” वापरा आणि फेकून द्या,” अशा नितीने वागवत असल्यामुळे आमदार सध्या चिंतेत सापडले आहेत.महागाई,बेरोजगारी,उद्योग व आर्थिक इ.क्षेत्रात अपयशी ठरलेल्या आपल्या सरकारच्या विरोधात वातावरण असल्याचे त्यांना जाणवू लागल्यामुळेत्यांची पळापळ सुरू होईल असे वाटते.” जहाज बुडू लागले की उंदीर जसे पळण्यास सुरुवात करतात,” तशी पळापळ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू होण्याची शक्यता आहे.

