दीपक मोहिते,
“न्यूजलाईन,”
अजित पवार हे भाजपची सोबत कधीच सोडणार नाहीत,
आज भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यात होत आहे.सुमारे साडेपाच हजार कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित राहतील,असा अंदाज भाजप नेते व्यक्त करत आहेत.या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हजर राहणार आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे.बैठक नुकतीच सुरू झाली असून नितीन गडकरीसह अनेक नेते देखील पुण्यात दाखल झाले आहेत.भाजपने या विधानसभा निवडणुकीत १६० जागा लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.त्यामुळे महायुतीमध्ये जागावाटपावरून पुन्हा घमासान होण्याची दाट शक्यता आहे.दुसरीकडे शिंदे व अजित पवार गटानेही प्रत्येकी १०० जागांवर दावा केला आहे.त्यामुळे महायुतीमध्ये नळावरचे भांडण आपल्याला पाहायला मिळणार आहे.यावेळी माध्यमांशी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे.ते म्हणाले,आम्ही अजित पवार यांना कदापि वाऱ्यावर सोडणार नाही,ते भविष्यात आमच्या सोबतच असतील.अशाप्रकारचे वक्तव्य करण्याची गरज त्यांना का भासली ? यामागची कारणे समजायला मार्ग नाही.पण अजित पवार गटाच्या आमदारांचे म्हणणे आहे की या विधानसभा निवडणुकीत ” भाजपची संगत नको रे बाबा,” या सर्वाना भाजप नको असताना,बावनकुळे बोलतात की आम्ही अजित पवार यांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही.याचा मेळ कसा लावायचा ? भाजपशी सोयरीक ही अजित पवार यांची गरज आहे,कारण ईडी,सीबीआय व राज्य आर्थिक गुन्हे शाखा या सर्व तपास यंत्रणा त्यांच्यासह सुनील तटकरे यांच्यावर टपून बसले आहेत.भाजपपासून फारकत घेतल्यास त्यांना अटकेची भितीआहे.त्यामुळे त्यांचे काही आमदार स्वगृही परतले तरी अजित पवार यांना भाजपसोबत राहावेच लागणार आहे.

