दीपक मोहिते,
केंद्र सरकारने मत्स्यव्यवसायाची भरभराट व्हावी,तसेच मच्छीमारांच्या आर्थिक स्थितीमध्ये आमूलाग्र बदल व्हावा,यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना कार्यान्वित केली आहे.या योजनेंतर्गत वसई तालुक्यातील अर्नाळा या मच्छिमार गावाची निवड करण्यात आली आहे.
या गावासाठी आराखडा तयार करण्यासाठी काल पालघर येथील सहा.आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मत्सव्यवसाय आयुक्तांनी ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी विविध मच्छिमार सह.संस्थांचे पदाधिकारी,ग्रामपंचायतीचे सरपंच,सदस्य व अधिकारी उपस्थित होते.
पालघर जिल्ह्यात वसई,पालघर व डहाणू तालुक्याला सुमारे ११२ की.मी.लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.अर्नाळा,वसई पाचूबंदर,सातपाटी,नवापूर,मुरबे,वडराई,डहाणू व धाकटी डहाणू या गावातील हजारो मच्छिमार कुटंबे या व्यवसायावर आपला उदरनिर्वाह चालवतात.पण गेल्या काही वर्षांपासून या व्यवसायाची विविध कारणांमुळे पीछेहाट झाली आहे.त्यामुळे केंद्र सरकारने व्यवसायाला दिलासा देणारी ही मत्स्यसंपदा योजना देशभरात लागू केली आहे.या योजनेंतर्गत अर्नाळा या मच्छिमार गावाची निवड करण्यात आली आहे.विविध विकासकामांसाठी २ कोटी रु.चा निधी मंजूर केला असून त्याचा विनियोग कसा व कोणत्या कामावर करायचा,याचा आराखडा तयार करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.केंद्रसरकारच्या या निर्णयाचे गावात सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.

 
									 
					

