दीपक मोहिते
पालघर जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न,समस्या सुटत नसल्यामुळे काल झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.त्यामुळे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत बैठक तहकूब केली.या बैठकीनंतर शरद पवार गटाचे आ.सुनिल भुसारा यांनी पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांवर नियंत्रण नसल्याचा थेट आरोप केला.
काल झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी अहवाल पूर्ण केला नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पालकमंत्री रविंद्र चव्हाण उपस्थित अधिकाऱ्यांवर भडकले.मंजूर करण्यात आलेल्या ठरावांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.आ.सुनिल भुसारा यांनी अधिकारी पालकमंत्र्यांचे ऐकत नसतील तर सर्वसामान्यांचे काय ? असा सवाल उपस्थित करत थेट पालकमंत्र्यांनाच लक्ष्य केले.अधिकारीवर्गाच्या गलथान कारभारामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या समस्या प्रलंबित आहेत.जिल्ह्यातील रस्त्यांची झालेली दुर्दशा,दर उन्हाळ्यात भेडसावणारी भीषण पाणीटंचाई,पटसंख्या अभावी बंद पडणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा,निरक्षरता,कुपोषण व बालमृत्यू,इ.समस्या आजही ” जैसे थे,” स्थितीत आहेत.त्यामुळे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा संताप अनावर झाला.

