दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
पक्षनिधी गोळा करण्यास आयोगाची संमती,ठाकरे व पवार गटात उत्साहाचे वातावरण,
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेनेला ( उबाठा ) मोठा दिलासा मिळाला आहे.आयोगाने त्यांना पक्षनिधी स्विकारण्यास मंजुरी दिली आहे.आयोगाच्या या निर्णयामुळे पक्षात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.यापूर्वी आयोगाने शरद पवार गटालाही पक्षनिधी स्विकारण्यास मंजुरी दिली होती.आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे व शरद पवार हे आता पक्षाचे नाव व चिन्ह परत मिळावे,यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करण्याच्या तयारीत आहेत.त्यांच्या पक्षांनी त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.त्याचा निकालही आपल्या बाजूने लागेल,अशी त्यांना खात्री वाटत आहे.
पक्ष फोडणे,आमदार पळवणे व अन्य अनिष्ट बाबींना हवा देत भाजपने राज्यात दोन वर्षांपूर्वी ठाकरे सरकार खाली खेचले होते.एकनाथ शिंदे यांनी सुमारे ४५ आमदारांना सोबत घेऊन मूळ शिवसेनेविरोधात बंड केल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लागले होते.त्यानंतर त्यांच्या पक्षाचे नांव व चिन्हही निवडणूक आयोगाने गोठवले व ते एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल केले होते.तसेच पक्षनिधी गोळा करण्यास मनाई केली होती.आयोगाच्या या निर्णयाविरोधात त्यांनी दाद मागितली होती.त्याबाबत आयोगाने पक्षनिधी गोळा करण्यास आता मंजुरी दिली.शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीतही हेच घडले होते.त्यांनाही काही दिवसांपूर्वी आयोगाने अशाच प्रकारचा दिलासा दिला होता.आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आर्थिक निधीचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे ठाकरे व पवार गटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.पक्षाचे फुटीर आमदारांचे निलंबन,पक्षाचे नाव व चिन्ह,इ.प्रकरणे आयोग व सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून त्या सर्व प्रकरणाचा निकाल आपल्या बाजूनेच लागतील,असा विश्वास ठाकरे व पवार यांना वाटत आहे.

 
									 
					

