दीपक मोहिते,
दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा – विरोधी पक्ष नेते मनोज पाटील,
वसई-विरार महानगरपालिकेतील सत्ताधारी बहुजन विकास आघाडी आणि पालिका प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराविरोधात, तसेच नागरिकांच्या वाढत्या समस्यांकडे होणाऱ्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली पालिका प्रवेशद्वारावर तीव्र निदर्शने केली.
आज सकाळी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी पालिका प्रशासनावर आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.
यावेळी ते म्हणाले,घनकचरा व्यवस्थापनातील ३८ कोटी रु.च्या घोटाळ्यात केवळ ठेकेदारच दोषी नसून ज्या अधिकाऱ्यांनी ही बिले तपासून मंजूर केली, ज्या कन्सल्टंटने प्रक्रियेला मान्यता दिली आणि ज्यांनी पेमेंट दिले, ते सर्व अधिकारी जबाबदार आहेत. ठेकेदाराने सादर केलेल्या बिलांची योग्य ती पडताळणी करणे आणि त्रुटी दूर झाल्याशिवाय पेमेंट न रोखणे,ही अधिकाऱ्यांची मुख्य जबाबदारी होती, मात्र अधिकाऱ्यांनी डोळेझाक करत गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांनी केला.
एफआयआर दाखल होऊनही संबंधित अधिकाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. हे अधिकारी महापालिकेत महत्त्वाच्या पदांवर कार्यरत राहिल्यास चालू असलेली चौकशी प्रभावित होण्याची आणि कागदपत्रांमध्ये फेरफार होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांची तात्काळ विभागीय चौकशी करून त्यांना पदावरून दूर करण्यात यावे, तसेच कन्सल्टंटवरही गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. महापालिका आयुक्तांकडे यापूर्वी विषय मांडूनही त्यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही, म्हणूनच भाजपला रस्त्यावर उतरून निदर्शने करावी लागली. आगामी काळात सर्व संबंधित वरिष्ठ यंत्रणांकडे पाठपुरावा करून या भ्रष्ट अधिकाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत आणल्याशिवाय भाजप शांत बसणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी यावेळी दिला.

