दीपक मोहिते,
पालघरवासियांना देशोधडीला लावणाऱ्या वाढवण बंदरा विरोधात जनआक्रोश…
वरोर येथे आयोजित करण्यात आलेल्या विनाशकारी वाढवण बंदरविरोधी जनआक्रोश सभेत हजारो ग्रामस्थानी सहभागी होऊन वाढवण विरोधी संघर्षाला पाठिंबा दिला.
वाढवण बंदर हा केवळ एक प्रकल्प नसून पालघर जिल्ह्यातील निसर्ग, पर्यावरण, शेती, मासेमारी आणि स्थानिक जनजीवनावर दूरगामी परिणाम करणारा ज्वलंत विषय आहे. या प्रकल्पामुळे समुद्रातील जैवविविधता, मासळीचे नैसर्गिक अधिवास आणि मच्छीमार बांधवांच्या पारंपरिक व्यवसायावर गंभीर परिणाम होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच शेतजमिनी, पाण्याचे स्रोत, पर्यावरणीय समतोल आणि शेतकऱ्यांच्या उपजीविकेवरही संकट कोसळण्याची शक्यता आहे. विकासाच्या नावाखाली स्थानिकांच्या हक्कांवर गदा आणणे, त्यांच्या जमिनी आणि उपजीविकेची साधने हिसकावून घेणे, त्यामुळे स्थानिक जनता गेल्या सात वर्षांपासून या प्रकल्पाला विरोध करत आहेत.सरकारने विकासाचे प्रकल्प राबवताना स्थानिक जनतेचा विश्वास, संमती आणि पर्यावरणाचे संरक्षण यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. केवळ मोठमोठ्या घोषणा करून विकास होत नाही. त्या विकासाचा लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे. सर्व विनाशकारी प्रस्तावित प्रकल्पांच्या विरोधातील लढ्याला बळ द्यायचे असेल, तर वाढवण बंदराच्या प्रश्नावर जनतेचा आवाज बुलंद होणे गरजेचे आहे. पालघरच्या जनतेच्या भविष्याशी संबंधित या लढ्यात सर्वांनी एकजुटीने सहभागी होण्याची आवश्यकता आहे. यावेळी सर्वपक्षीय ज्येष्ठ नेते, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, स्थानिक नागरिक, शेतकरी, मच्छीमार बांधव तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.पालघरचा निसर्ग वाचला पाहिजे, शेतकरी आणि मच्छीमार जगला पाहिजे, स्थानिकांचा हक्क अबाधित राहिला पाहिजे, असे प्रत्येक वक्त्याने आपल्या भाषणात म्हंटले.

