दिपक मोहिते,
आम्ही सारे गाफिल, ( भाग क्र.१ )
असंख्य नद्या असूनही हजारो गावे तहानलेलीच…
पालघर जिल्हा,हा देशातील ३६ वा जिल्हा आहे.सात वर्षांपूर्वी देशातील सर्वात मोठ्या जिल्ह्याचे विभाजन करून १ ऑगस्ट २०१४ रोजी नवीन आदिवासी जिल्हा निर्माण करण्यात आला. नागरी परिसराचा विचार न करता तत्कालीन राज्य सरकारने सागरी व डोंगरी,असे जिल्हा विभाजन केले.
अनेक वर्षे चर्चेत असलेला हा नवीन जिल्हा अस्तित्वात आला व जिल्ह्यातील जनतेचा आनंद गगनात मावेनासा झाला.ग्रामीण विकासाला चालना मिळून आपले जीवन सुख-समृद्धीने बहरेल,अशी सर्वसाधारण अपेक्षा होती.पण गेल्या बारा वर्षात प्रशासनाचा लालफितीचा कारभार व लोकप्रतिनिधींची बुरसटलेली मानसिकता,यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या जीवनात फारसा फरक पडला नाही.पाणी, शिक्षण, आरोग्य, कृषी, साक्षरता व पायाभूत सुविधा,इ.क्षेत्रात भरीव विकासकामे होऊ शकली नाहीत. कुपोषण व बालमृत्यूचे प्रमाण सतत वाढतच आहे.पूर्वाश्रमीच्या ठाणे जिल्ह्यात या परिसराचा समावेश असताना जे प्रश्न व समस्या प्रलंबित होत्या.त्या आजही ” जैसे थे,” स्थितीतच आहेत. त्या सोडवण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न झाला नाही व लोकप्रतिनिधीनीही यासंदर्भात आपली जबाबदारी पार पाडली नाही.
नव्याने जिल्हा अस्तित्वात आल्यानंतर लोकसंख्या वाढीला प्रचंड वेग आला व नागरी सुविधांचा बोजवारा उडाला.आजच्या घडीला जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ३० लाखाच्या घरात पोहोचली असून इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या जिल्ह्याला पाणीपुरावठ्यासाठी पाण्याचे अतिरिक्त स्रोत निर्माण करणे,आवश्यक होते.पण त्यादृष्टीने प्रशासनाने प्रयत्न केले नाहीत व राज्यसरकारच्या पाणीपुरवठा विभागानेही जाणीवपूर्वक या महत्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष केले.
आज पिण्याचे पाणी व शेतीसिंचनासाठी उपलब्ध असलेले पाणी पुरेसे नाही. ग्रामीण भागातील जनतेला पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे,तर शहरी भागात लोकांना एकदिवस आड येणाऱ्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. जिल्ह्यात भात व नागली,या दोन कृषी उत्पनाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. पाण्याअभावी हे क्षेत्र घटत चालले आहे.* *जिल्ह्यातील शेती,ही पावसाळी पाण्यावर करण्यात येते. पण गेल्या बारा वर्षात पावसाचे प्रमाण देखील सतत कमी होत गेल्यामुळे शेतकरीवर्ग दरवर्षी संकटात सापडतो. गेल्या बारा वर्षात नवीन पाणीपुरवठा योजना सुरू करण्याbसंदर्भात प्रशासनाने कोणतेही नियोजन केले नाही. केवळ उपलब्ध पाणी व टँकरचे दूषित पाण्यावर त्यांनी दिवस ढकलले, लघुपाटबंधारे विभागातर्फे छोटे बंधारे,गावागावात तलाव खोदाई,पाणी अडवा, पाणी जिरवा योजना राबवणे, दर पावसाळ्यात डोंगरावरून वाहून जाणारे कोट्यवधी लिटर पाणी अडवण्यासाठी छोटी धरणे बांधणे,या कामाना प्राधान्य द्यायला हवे होते. जिल्ह्यात बारमाही वाहणाऱ्या असंख्य नद्या आहेत.पण जिल्हाप्रशासनाकडे इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे या नद्यांच्या पाण्याचा वापर करण्यात येत नाही.
क्रमश:

