दीपक मोहिते,
अस्मानी संकट,
उद्या प्रस्तावित वाढवण बंदर विरोधात वरोर येथे जनआक्रोश सभेचे आयोजन,
पालघर जिल्ह्यातील वाढवण येघे होऊ घातलेले विनाशकारी महाकाय बंदराच्या विरोधात स्थानिक जनतेचा आक्रोश दिवसेंदिवस वाढत चालला आहे. येत्या ३० ऑक्टो. रोजी स्थानिक जनतेतर्फे वरोर येथे जनआक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी हे तिघे ” हा प्रकल्प स्थानिकांना रोजगार मिळवून देणारा तसेच तो जिल्ह्याला चौथी मुंबई बनवण्याच्या दिशेने नेणारा आहे, असा दावा करत आहेत. पण त्यांच्या या दाव्यात बिलकुल तथ्य नाही, उलट हा विनाशकारी प्रकल्प आम्हा स्थानिकांना देशोधडीला लावणारा आहे, असा आरोप करण्यात येत आहे.
या बंदरासाठी समुद्र किनारपट्टीपासून ६ कि.मी आत समुद्रात भराव करून १ हजार ४४८ हे. जमीन तयार करण्यात येणार आहे. या भरावासाठी ७ कोटी टन दगड आणि मुरूम लागणार आहेत. त्यासाठी नानिवली, महागाव, गारगाव खानिवडे बोरशेती, किराट व गिमोली या वीस कि.मी.अंतरावरुन असलेल्या गावातून हे दगड व मुरूम आणण्यात येणार आहेत. येथील डोंगर जलस्रोत व जैवविविधता नष्ट होणार आहे. तसेच परिसरातील वाढवण,आगर, नरपड, डहाणु, गुंगवाडा, वरोर,दांडेपाडा, तारापूर, चिंचणी,घिवली, कंबोडे, ताडीयाळे,धूमकेतू, आसनगाव,अब्राम व माटगाव अशी अनेक गावातील सुमारे २० हजार मच्छिमारांवर आपली रोजी – रोटी गमावण्याची वेळ येणार आहे. समुद्रात होणाऱ्या ड्रेजिंगमुळे माश्याचा अधिवास, मत्स्यउत्पादन व माश्याच्या पिलांचे संगोपन यावर चांगलाच परिणाम होणार आहे. जल, जमीन, जंगल व वनसंपदा नष्ट करून हा विनाशकारी प्रकल्प उभारण्यात येत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच सुमारे २१ गावातील ५० हजार लोकांना विस्थापित करून हा प्रकल्प आमच्या उरावर उभारण्यात येत असल्याचा आरोप, या २१ गावातील भूमिपुत्र करत आहेत. सगळे कायदे धाब्यावर बसवत केंद्र सरकार हा प्रकल्प उभारत आहे.त्याच्या निषेधार्थ येत्या ३० ऑक्टो.रोजी वरोर येथे ग्रामस्थांनी जनआक्रोश सभेचे आयोजन केले आहे.
या सभेसाठी पालघर व इतर जिल्ह्यातून ग्रामस्थ येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

