दीपक मोहिते,
राजकीय वार्तापत्र, ( १३१ बोईसर विधानसभा )
… तर एकनाथ शिंदे यांना दुसरा उमेदवार शोधावा लागणार,
*१३१ बोईसर विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेल्या आ. विलास तरे यांची कारकीर्द फारशी प्रभावी राहिली नाही. त्यामुळे हा मतदारसंघ विकासाच्या बाबतीत कायम मागासलेलाच राहीला. २००९, २०१४ व २०२४ मध्ये त्याना विजय मिळाला. २०१५ – २०१६ दरम्यान बहुजन विकास आघाडीच्या वरिष्ठासोबत मतभेद झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला व २०१९ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली. मात्र त्यांच्या विरोधात भाजपचे बंडखोर उमेदवार संतोष जनाठे उभे राहीले व तरे यांचा २ हजार ७७३ मतांनी पराभव झाला. सेना व भाजपकडून एकमेकांचे उमेदवार पाडण्याच्या खेळात तरे यांचा बळी गेला. जनाठे यांना कोणी रसद पुरवली, हा एक वेगळा विषय आहे.
या निवडणुकीत जनाठे यांनी ज्या पद्धतीने प्रचार केला तो पाहून मतदारांनी अक्षरश : तोंडात बोटे घातली. या निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार जनाठे यांना ३० हजार ९५२ मते मिळाली व तरे यांचा २ हजार ७७३ मतांनी पराभव झाला.भाजप व शिवसेनेच्या पाडापाडीच्या राजकारणात विलास तरे यांचा बळी गेला. बोईसरवासियांना अपेक्षित नसतानाही राजेश पाटील यांच्या गळ्यात विजयश्री पडली. २००९, २०१४ व २०२४ साली निवडून आलेले आ, विलास तरे व २०१९ साली अनपेक्षितरित्या विजयी झालेले राजेश पाटील या दोघांनाही भरीव विकासकामे करता आली नाहीत. त्यामुळे हा मतदारसंघ आजही मागासलेलाच राहीला आहे.गेल्या दहा वर्षात बोईसर पश्चिम भागात प्रचंड नागरिकरण झाले. त्यामुळे येथे नगरपरिषद निर्माण व्हायला हवी होती. या भागाचा कारभार अद्याप ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होत आहे. बोईसर शहराची लोकसंख्या सध्या एक लाखाच्या घरात पोहोचली आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण व अन्य पायाभूत सुविधापासून हा परिसर वंचितच आहे. वाहतूककोंडी, पाणीटंचाई, औद्योगिक क्षेत्रात कामगारांची होणारी पिळवणूक, सरकारी जमिनीची लूट, अनधिकृत बांधकामाचे आलेले पीक, इ. समस्या सोडवण्यासंदर्भात लोकप्रतिनिधी या नात्याने विलास तरे यांनी काहीही केले नाही. त्यांचा २०२४ साली झालेला विजय हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा करिष्मा होता. त्यांच्या प्रभावामुळे तरे यांना १ लाख २६ हजार ११७ मते मिळाली तर राजेश पाटील यांचा ८१ हजार ६६२ मतांवर अडखळला व विलास तरे यांचा ४४ हजार ४५५ मताच्या फरकाने विजय मिळाला. बोईसरच्या मतदारांनी जो विश्वास त्यांच्यावर दाखवला, त्याची उतराई करण्याऐवजी आ. विलास तरे हे कायम निष्क्रिय राहीले. त्यांची ही अशी निष्क्रियता कायम राहिली, तर पुढच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना दुसरा उमेदवार शोधावा लागणार आहे.

