दीपक मोहिते,
” हल्लाबोल, ”
नालासोपारा येथे घडलेले लव जिहाद प्रकरण ; पोलीस यंत्रणेचे दारुण अपयश,
नालासोपारा शहरातील वाढती गुन्हेगारी व कायदा / सुव्यवस्थेची ढासळती स्थिती, यावर आजवर बरंच काही लिहिले गेले. पण, त्याची दखल शासकीय यंत्रणांनी कधीही घेतली नाही. पण, नवरात्रोत्सव काळात नुकतेच घडलेल्या लव जिहाद प्रकरणाने पोलीस, स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या अब्रूची लक्तरे वेशीला टांगली गेली.
१२ ऑक्टो. रोजी नालासोपारा पोलीस ठाण्यात २३ वर्षे वयाच्या हिंदु तरुणीने तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरीफ अयुब शेख – २२, ( जिम ट्रेनर ) त्याची आई रुखसाना खान व त्याचा मावस भाऊ साहिल खान या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. मैत्री व लग्नाचे आमिष दाखवून लैगिक अत्याचार, घरात डांबून जबर मारहाण, गोमांस खाण्याची, बुरखा घालण्याची सक्ती आणि धर्मांतरासाठी दबाव, असे विविध आरोप या तिघांवर करण्यात आले आहेत. तसेच आरोपीने ” येत्या दोन वर्षात सर्व हिंदु संपतील, त्यामुळे धर्मांतर कर, अशी धमकी दिल्याचा दावा करण्यात आला आहे. पिडीत तरुणीने दावा केला आहे कि आरोपीच्या मोबाईलमध्ये अनेक हिंदू तरुणींचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडियो आहेत आणि या आरोपीने सुमारे ७० ते ८० हिंदू तरुणींना टार्गेट केले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी आता विशेष तपास पथक ( एसआयटी ) स्थापन केली आहे. दरम्यान पोलिस आरोपीच्या मोबाईलमधील व्हिडीओ जप्त केले असून त्यांची संख्या आणि पॉर्न साईटवर विक्रीच्या आरोपातील तथ्य तपासत आहेत. यापूर्वी सकल हिंदू समाज, हिंदू जनजागृती समिती, हिंदू गोवंश समिती व हिंदू गोवंश रक्षा यासारख्या संघटनानी आंदोलन केले होते. स्थानिक हिंदुत्व संघटनानी नवरात्र, गणेशोत्सव अशा हिंदू सणामध्ये जाणीवपूर्वक हिंदू तरुणींना टार्गेट करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे.
दुसरीकडे स्थानिक व विरोधक, सरकार तुमचे, पोलीस खाते तुमचे, मग तूम्हाला रस्त्यावर उतरून मोर्चा काढायची वेळ का येते ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर भाजपचे नेते, विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे म्हणणे आहे कि हा मोर्चा पोलिसांच्या विरोधात नाही. तर पोलिसांवर दबाव वाढण्यासाठी व पिडीत मुलीला न्याय मिळावा म्हणून आहे. सुरुवातीला पोलीस हे प्रकरणाकडे साधारण फसवणुकीचे प्रकरण म्हणून पाहत होते. मोर्चे व सोशल मिडीयावरून दबाव आल्यानंतर आयुक्त निकेत कौशिक यांनी स्वतः जातीने लक्ष घालुन विशेष तपास पथक ( एसआयटी ) स्थापन केले. दरम्यान स्थानिक नागरिकानी हे सरकारचे अपयश असून ७० ते ८० मुलींचे व्हिडीओ बनवले जाईपर्यंत कारवाई होत नसेल आणि तुम्हाला मोर्चा काढावा लागत असेल तर तुमची यंत्रणा कुचकामी ठरली आहे, असा आरोप केला आहे. आज निघालेला मोर्चा हा राजकीय शक्तीप्रदर्शन आहे, असे नागरिकांनी माध्यमाच्या प्रतिनिधीना सांगितले.

