दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
वसईचे राजकीय चित्र बदलतंय,
वसई व नालासोपारा मतदारसंघाचे राजकीय चित्र आता बदलत चालले आहे. वर्ष – दीड वर्षांपूर्वी येथील मतदारांनी या दोन मतदारसंघात जे परिवर्तन घडवून आणले, आज त्यांच्यावर पश्चाताप करण्याची पाळी आली आहे. बहुजन विकास आघाडीच्या कारभाराला कंटाळून येथील मतदारांनी भाजपला डोक्यावर घेतले. पण आज त्याच मतदारांवर कपाळावर हात मारून घ्यायची पाळी आली आहे.
वसईच्या आ. स्नेहा दुबे पंडित यांनी आपल्या सुरवातीच्या कारकिर्दीत वसईच्या विकासाकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले. त्यानंतरच्या काळात त्या राज्य पातळीवरील राजकारणात वावरू लागल्या. त्यामुळे त्यांचा आपल्या मतदारसंघाशी फारसा संपर्क राहीला नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना धोका होण्याची शक्यता आहे. वसईचा मतदार हा माजी आ. हितेंद्र ठाकुर वगळता कोणालाही दुसऱ्यांदा संधी देत नाही, असा आजवरचा अनुभव आहे. आ. स्नेहा दुबे पंडित यांनाही त्याचा अनुभव काही वर्षांपूर्वी आला आहे. महानगरपालिकेच्या कामकाजात बहुजन विकास आघाडीला विरोध करताना वसईकरांच्या समस्या व मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत आहे, याची त्यांना जाणीव असायला हवी. बहुजन विकास आघाडी तुम्हाला दाद देत नाही. त्यामुळे त्यांनी राज्यसरकारकडे दाद मागायला हवी. मुख्यमंत्री देवाभाऊ यांना तुम्ही वारंवार भेटता विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लागल्याचे रिल्स व बातम्या व्हायरल करता, पण प्रत्यक्षात आजवर एकही विकासकाम मार्गी लागू शकले नाही, हे खऱ्या अर्थाने येथील जनतेचे दुर्देवच म्हणावे लागेल. महानगरपालिकेच्या प्रत्येक महासभेत तुमचे नगरसेवक प्रचंड गोंधळ घालत असतात. सत्ताधारी पक्षाच्या मनमानी कामकाजावर बहिष्कार घालणे, हा लोकशाही व्यवस्थेत अधिकार आहे. पण त्याचा किती वापर करणे, यालाही मर्यादा आहेत. या अधिकाराचा वारंवार वापर होणे, म्हणजे हा अधिकार बोथट करण्यासारखे आहे. सत्ताधारी मंडळी जुमानत नसतील तर कोकण आयुक्त, नगरविकास विभाग येथे दाद मागता येते. या विभागाकडून न्याय मिळत नसेल तर उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय आहे. पण या प्रक्रियेचा वापर न करता सभागृहात गोंधळ घालणे, हे संयुक्तिक नाही. आरडाओरड करून किंवा कामकाजावर बहिष्कार टाकून विकासकामे मार्गी लागत नसतात. तुमच्या नगरसेवकांना महानगरपालिकेच्या कामकाजाचा फारसा अनुभव नाही. त्यासाठी प्रशिक्षण शिबीरे आयोजित केली पाहिजेत. ” मन की बात, ” ऐकण्यासाठी जसे तुम्ही सारे एकत्र येता तसे अशा प्रशिक्षण शिबिराना त्यांना पाचारण करा. अन्यथा आगामी सर्व निवडणूकांमध्ये तुम्हाला मतदान करणारा मतदार तुमच्या पक्षापासून दुरावेल,
टीप : उद्याचा लेख : आ.राजन नाईक ( नालासोपारा विधानसभा )

