दीपक मोहिते,
” फ्रंटलाईन,”
ठाणे जिल्हा : राजकीय वार्तापत्र,
एकनाथ शिंदे आपला बालेकिल्ला शाबूत राखणार का ?
ठाणे जिल्ह्यात महायुतीमध्ये आता सुतळी बॉम्ब फुटू लागले आहेत. ठाणे जिल्हा हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.भविष्यात या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करण्याची शक्यता आहे. या अशा भितीमुळे शिंदे यांनी या बालेकिल्ल्याच्या अवती – भवती भक्कम तटबंदी उभारण्याची तयारी चालवली आहे.
अंबरनाथ आणि उल्हासनगर येथे त्यांच्या पक्षाच्या जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. अंबरनाथमधील भाजपच्या नगरसेवकांनी काल थेट शिंदे यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर उल्हासनगर मधील भाजपने महायुती तोडण्याचा प्रस्ताव प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे पाठवून दिला आहे. येथील भाजपचे काही नगरसेवक शिंदे यांच्याकडे जाण्याच्या तयारीत असल्याची कुणकुण लागल्यानंतर भाजपच्या स्थानिक नेत्यांनीही हालचाली सुरु केल्या आहेत. काही दिवसापूर्वी मुंब्रा येथील राष्ट्रवादी काँगेसचे स्थानिक नेते युनूस शेख यांना शिंदे यांनी जवळ केले. त्यामुळे भाजप नाराज झाला व त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक असलेले युनूस शेख यांनी आपला केबल व्यवसाय धोक्यात येऊ नये, म्हणून ते शिंदे गटात सामील झाले. मुंब्रा येथे आव्हाड यांचे असलेले वर्चस्व मोडून काढण्यासाठी शिंदे यांनी ही खेळी केली. पण भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना ती मान्य झाली नाही.
या सर्व घडामोडीनंतर ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर त्यांच्या गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे व त्यांचे पती राजू शिंदे यांच्यावर आरोप करण्यात आले. या आरोपानंतर शिंदे पत्नी व पतीवर गुन्हे दाखल झाले. त्यामुळे शिंदे गट पुन्हा अडचणीत आला. हे सारे रामायण घडत असताना एकनाथ शिंदे यांच्यावर जरांगे पाटील यांनी ५०० कोटीचा आरोप करत त्यांचे हे प्रकरण उघड केले. त्यामुळे शिंदे यांची चांगलीच कोंडी झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक व आ.संजय केळकर या तिघांचे शिंदे यांच्याशी बिलकुल पटत नाही. पण, राज्यस्तरावर असलेल्या महायुतीमुळे हे तिघे सध्या ” तोंड बांधून बुक्क्याचा मार, ” सहन करत आहेत. ठाण्यात वर्चस्व कोणाचे ? यावरून महायुतीमध्ये सध्या चांगलीच जुंपली आहे.
एका बाजूला भाजपचे अडवणुकीचे धोरण व दबाव, दुसरीकडे विरोधकांकडून मागे लागलेले शुक्लकाष्ट, अशा दुहेरी कोंडीत शिंदे सापडले आहेत. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे आपला बालेकिल्ला कसा शाबूत राखतात ? याकडे ठाणेवासियांचे लक्ष लागले आहे.

