दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
… तर वेगळे चित्र दिसले असते,
१३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील सुमारे ५० हजार मतदार कुठे गेले ? असा सवाल माजी आ. हितेंद्र ठाकूर यांनी नुकताच उपस्थित केला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी काही इसमांना नांवे वगळण्यासाठी आवश्यक असलेल्या अर्जाचे गट्ठेच्या गट्ठे निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले होते. वास्तविक आपले नांव समाविष्ट करणे किंवा वगळणे यासाठी कोणतेही अर्जदार समोर आले नसताना इतर व्यक्तींना अशाप्रकारे अर्जाचे गट्ठे देणे बेकायदेशीर होते. पण त्यावेळी कोणीही हरकत न घेतल्यामुळे अनेकांची नांवे वगळली गेली व बोगस नावांचा समावेश केला गेला. हा गैरप्रकार त्या निवडणुकीवर चांगलाच प्रभाव टाकणारा ठरला.
निवडणुकीपूर्वी मतदारयादीत ज्या व्यक्तीची नांवे समाविष्ट करण्यात आली किंवा ज्यांची नांवे वगळण्यात आली. त्यांची नांवे, निवासी पत्ता याविषयीं त्यांच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांकडे चौकशी करण्याची मागणी निवडणूक शाखेकडे किंवा न्यायालयाकडे केली असती तर या दोन्ही मतदारसंघात आज वेगळे चित्र बघायला मिळाले असते. या संदर्भात मी निवडणुकीपूर्वी जातीने एका पक्षाच्या वरिष्ठ नेत्याच्या कानावर सदर बाब घातली होती, पण त्या नेत्याला त्यावेळी त्याचे गांभीर्य वाटले नाही व पुढचे महाभारत घडले.

