दीपक मोहिते,
” घडलंय बिघडलंय,”
गुन्हेगारीमध्ये सतत होणारी वाढ ; फडणवीस सरकारचे दारुण अपयश,
राज्यात सतत घडत असलेले गुन्हे, कायदा व सुव्यवस्थेची ढासळती परिस्थिती व पोलिसांची निष्क्रियता, यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या विरोधकांच्या रडारवर आले आहेत. गुन्हेगारीमध्ये दिवसेंदिवस होत असलेली वाढ व त्यावर नियंत्रण मिळवण्यासंदर्भात त्यांच्या गृहविभागाला आलेल्या अपयशामुळे सध्या विरोधकांनी फडणवीस सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.
३५ वर्षांपूर्वी मुंबई, ठाणे व वसई विरार भागात अंडरवर्ल्डच्या गुंडानी जसा धुमाकूळ घातला होता. नेमकी तशीच परिस्थिती पुन्हा निर्माण होत असल्याची भिती नागरिक व्यक्त करत आहेत. पूर्वी राज्यातील गुंडाच्या टोळ्या सक्रिय होत्या, आता परराज्यातील टोळ्यांच्या गुंडानी थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. गोळीबाराच्या घटनामध्ये वाढ झाली असून मुंबई, ठाणे व वसई विरार उपप्रदेशात गुन्हेगारीला अक्षरशः ऊत आला आहे. ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर यांची झालेली हत्या, टायगर श्रॉफ याच्यावर झालेला गोळीबार या दोन्ही घटना अलीकडच्या काळात घडल्या. या दोन्ही प्रकरणातील संशयित आरोपीना पकडण्यात पोलिसांना यश आले असले तरी लोकांच्या मनात असलेली भिती आजही कायम आहे.
मुंबई, ठाणे या दोन महानगराच्या पाठोपाठ वसई विरार परिसरही आता गुन्हेगारी जगताच्या क्रमवारीत अव्वल क्रमांकावर स्थिरावला आहे. काही वर्षांपूर्वी राज्य सरकारने पालघर जिल्ह्यातील वसई,विरार, मिरा – भाईंदर भागातील गुन्हेगारीचा वाढता आलेख पाहून पालघर ग्रामीण पोलीस व मिरा – भाईंदर, वसई विरार आयुक्तालय असे दोन विभाग निर्माण केले. मात्र शहरी भागातील गुन्हेगारी कमी होण्याऐवजी ती सतत वाढतच गेली. २०२५ साली एकूण २ हजार १२१ गुन्हे घडले. त्यामध्ये हत्या, बलात्कार, अपहरण, जबर मारहाण, घरफोडी,अमली पदार्थाचा व्यापार व लूटमार अशा गुन्ह्याचा समावेश होता. जिल्ह्याच्या आयुक्तालय क्षेत्रात सर्वाधिक गुन्हे हे विरार व नालासोपारा या दोन शहरात घडले. नालासोपारा शहर हे तर गुन्हेगारी जगतात नावारूपाला आलेले शहर म्हणून ओळखले जाते. अशी परिस्थिती असताना राजकारणी मंडळी या अशा शहराला ऐतिहासिक शूर्पारक नगरी असे नामकरण करण्याच्या स्वप्नरंजनात रमले आहेत. आयुक्तालय क्षेत्राच्या तुलनेत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गुन्हेगारीने अद्याप डोके वर काढलेले नाही. बोईसर शहराची वाढती लोकसंख्या व जमिनीला आलेले भाव, लक्षात घेता हे शहर देखील भविष्यात नालासोपारा शहरासारखे बदनाम होणार आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार व मोखाडा तालुक्यात सर्वात कमी गुन्हे घडले. भ्रष्टाचार, आश्रमशाळेतील अत्याचार व आत्महत्या, अशाचा त्यामध्ये समावेश आहे. जिल्ह्याच्या शहरी भागात अमली पदार्थाचा होत असलेला व्यापार, हा तरुणवर्गाला उध्वस्त करणारा ठरणार आहे. या गैरप्रकारात पोलीस सामील असल्याचे नुकतेच घडलेल्या एका प्रकरणावरून दिसून आले आहे. गुन्ह्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता, मुंबई, ठाणे पाठोपाठ वसई विरार उपप्रदेश देखील गुन्हेगारी जगतामध्ये पुन्हा नावारूपाला येण्याची शक्यता आहे, नालासोपारा शहर हे आताच अमलीपदार्ध विक्रीचे केंद्र बनले आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यात फडणवीस सरकारच्या गृहविभागाला शक्य होईल, असे या शहरातील नागरिकांना वाटत नाही.ज्या उपप्रदेशाला सरकार ” चौथी मुंबई,” म्हणते, तो उपप्रदेश हळूहळू ज्वालामुखीवर वसण्याच्या तयारीत आहे.

