दीपक मोहिते,
रिलीफ हॉस्पिटल राडा : ११ आरोपींचा जामीन पुन्हा फेटाळला,
पालघरच्या रिलीफ हॉस्पिटलमध्ये दहीहंडीतील जखमी गोविंदाच्या उपचारावरून झालेल्या राडा प्रकरणात ११ प्रमुख आरोपींचा जामीन काल पुन्हा फेटाळण्यात आला. त्यामुळे हे ११ आरोपी अजूनही न्यायालयीन कोठडीतच राहणार आहेत.५ सप्टें. २०२६ रोजी दहीहंडी उत्सवात जखमी झालेल्या ५ गोविंदांना रिलीफ हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. १९ हजार ८६६ रु.च्या बिलावरून वाद झाला. डॉक्टर-कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, धमक्या आणि कर्मचारी विवेक झिंगा यांना कानशिलात मारल्याचा आरोप आहे. ६ सप्टें.ला पालघर पोलिसात गुन्हा दाखल झाला. एकूण २३ जणांना या प्रकरणी अटक झाली होती.
या प्रकरणातील आरोपीना महाराष्ट्र मेडिकेअर सर्व्हिस पर्सन्स अँड मेडिकेअर सर्व्हिस इन्स्टिट्यूशन्स ( प्रिव्हेन्शन ऑफ व्हायोलन्स ) ऍक्ट, २०१० लावण्यात आला आहे.या गुन्ह्यात पोलीस ठाण्यातून जामीन मिळत नाही, फक्त कोर्ट जामीन देऊ शकतं. तपास सुरू आहे, साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो, असा पोलिसांचा युक्तिवाद कोर्टाने मान्य केल्यामुळे या आरोपीच्या कोठडीत सतत वाढ होत आहे. आधी २७ ऑक्टो.ला ११ गोविंदा + १ कॅमेरामन यांना जामीन मिळाला होता. पण ११ शिवसेना पदाधिकारी मात्र अजून आतच आहेत.आता त्यांच्याकडे मुंबई हायकोर्टात जाण्याचा पर्याय आहे. डॉक्टर प्रोटेक्शन कायदा काय आहे ? हा कायदा १७ फेब्रु. २०१० पासून महाराष्ट्रात लागू करण्यात आला आहे. डॉक्टर, नर्स, मेडिकल विद्यार्थी, पॅरा-मेडिकल कर्मचारी, वॉर्डबॉय, सुरक्षारक्षक यांना संरक्षण, मारहाण, शिवीगाळ, धमकी, तोडफोड,चिथावणी देणं, हे या कलमा नुसार गुन्हा ठरवण्यात आले आहे. या गुन्ह्यात ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास + ५० हजार पर्यंत दंड व नुकसानीच्या दुप्पट भरपाई द्यावी लागते.

