*lदीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
नालासोपारा प्रकरण ; सर्वानी एकत्र यायला हवे…
वसई तालुक्यात बहुजन विकास आघाडी व भाजप हे दोन पक्ष प्रत्येक प्रश्नावर एकमेकाविरोधात कायम दंड थोपटून उभे राहत असतात. प्रत्यक्षात या दोघांना करदात्याच्या अडचणी, समस्या तसेच परिसर विकासाशी कोणतेही देणेघेणे नसते. न केलेल्या विकासकामाचे श्रेय उपटण्यासाठी हे दोन्ही पक्ष एकमेकांचे गळे आवळत असतात. यालाच आपण राजकारण म्हणत असतो. या अशा धूमश्चक्रीचा करदात्यांना कसलाही फायदा होत नसतो. त्यामुळे तेही त्यांच्या ” तीन पैश्याचा तमाशा,” च्या नौटंकीला फारसे गांभीर्याने घेत नाहीत.
पण,चार दिवसापूर्वी नालासोपारा पूर्वेस श्रीराम नगर वसाहतीमध्ये जे काही घडलं, ते माणुसकीला काळिमा फासणारे होते. आपला महाराष्ट्र हा मणिपूर किंवा बिहार नाही, एका सुशिक्षित नगरीमध्ये अनेक कुटुंबाना जीवाच्या आकांताने पलायन करावे लागते, हे आपल्या संस्कृतीला शोभदायक नाही तर माणुसकीला काळे फासणारे आहे. त्यासाठी तालुक्यातील राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपल्या राजकीय चपला बाहेर ठेवून या ज्वलंत प्रश्नावर एकत्र आले पाहिजे. अशाप्रकारची घटना घडू नये, यासाठी या नेत्यांनी पोलीस यंत्रणेवर दबाव वाढवला पाहिजे. रात्रीच्या वेळी कोंबिग ऑपरेशन, वाहने तपासणी, संशयास्पदरित्या फिरणाऱ्या तरुणांना ताब्यात चौकशी करणे व चाळीतील घरामध्ये भाडेतत्वावर राहणाऱ्या व्यक्तीची चौकशी करणे, ही कामे पुन्हा सुरु करण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यावर दबाव आणणे, गरजेचे आहे. २००५ साली वसईचे तत्कालीन पोलीस उपअधिकारी महेश पाटील यांनी सलग दोन ते तीन महिने अशाप्रकारची मोहीम राबवली होती. त्यांच्या या प्रयत्नाला चांगले यश मिळाले होते. त्यावेळी या मोहिमेत अनेक तडीपार गुंड पोलिसांच्या हाती लागले होते.कालांतराने त्यांची बदली झाली व कोम्बिंग ऑपरेशन मोहीम पोलिसांनी बासनात गुंडाळली. हा इतिहास सांगण्याची गरज का भासली तर चार दिवसापूर्वी जे काही घडलं त्याने पोलीस व राजकारणी या दोघांना दोषी ठरवले आहे. या शहराचे नांव शूर्पारक नगरी नंतर करा, सर्वप्रथम या शहरातील नागरिकांना सुरक्षितपणे जगता येईल, अशी परिस्थिती निर्माण करा, असे नागरिकांचे म्हणणे आहे.आज या शहरात ड्रग्जचा धुमाकूळ सुरु आहे. तरुण मुले या व्यसनाच्या आहारी जात आहेत. त्यावर नियंत्रण मिळवायचे असल्यास या सर्वानी एकत्र येण्याची गरज आहे. पोलीस यंत्रणेवर सामूहिक दबाव आल्याशिवाय ती जागी होत नाही, असा अनुभव आपण आजवर घेत आलो आहोत.त्यामुळे राजकारणी मंडळींनी आपले सारे मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे.

