दीपक मोहिते,
” घडलंय बिघडलंय,”
लोकशाही व्यवस्थेत एकाधिकारशाहीला स्थान नाही…
अमेरिकेत नुकत्याच झालेल्या सिनेट व हाऊसच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे ट्रम्प यांचे हवेत उडणारे विमान चांगलेच खाली आले आहे. एरवी डेमोक्रेट्सना विचित्र वागणूक देणाऱ्या ट्रम्प यांनी ” democrates did well,” अशा शब्दात अभिनंदन केले.राजकारणात चढउतार असतात, त्यामुळे कोणीही अहंकाराने पालथे पडायचे नसते. पण गेल्या दोन वर्षांपासून ट्रम्प हे सातत्याने नको ते उपदव्याप करत राहीले. अमेरिकन जनतेने याकाळात खूप काही सोसले. अखेर संधी मिळताच त्यांनी आपली वाघनखे बाहेर काढली व डोनाल्ड ट्रम्प आता घायाळ व गलितगात्र झालेल्या सिंहासारखे वाटू लागले आहेत. म्हणून राजकारणात कधी काय होईल, हे सांगता येत नाही.
बेरोजगारी, सतत युद्धाची स्थिती, लढाईचा वाढता खर्च, अनेक देशाशी शत्रूत्व, सरकारकडून धोरणात वारंवार होणारे धोकादायक बदल, आदी कारणामुळे अमेरिकन जनता ट्रम्प प्रशासनाच्या कारभाराला पार विटली होती. इस्त्रायलच्या नादी लागून ट्रम्प यांनी स्वतःच्या देशाला संकटात टाकले, असा प्रचार डेमोक्रेट्सने या निवडणुकीत केला. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला चांगलाच फटका बसला. अमेरिकेने पॅलेस्टाईन, इराण व इस्त्रायलच्या युद्धात आपण उतरायला नको होते, पण ट्रम्प यांनी इतर पक्षाना विश्वासात न घेता अनेक निर्णय घेतले व ते चांगलेच अंगलट आले. या सर्वांचा परिणाम अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर झाला व त्यांना या निवडणुकीत हार पत्करावी लागली. मतदारांच्या मनात काय चालले आहे, याचा अंदाज ट्रम्प व त्यांच्या कंपूला आला नाही व आज त्यांच्या पक्षाचे होत्याचे नव्हते झाले. राजकारणात अहंकार, मुजोरी व ” हम करेसो कायदा,” असे चालत नाही. आपल्याकडेही सध्या त्याच पद्धतीने कारभार सुरु आहे.शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्या माजी शिक्षणमंत्री प्रधान यांना हटवण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी आपले रक्त सांडले, मुख्य निवड निवडणूक आयुक्ताना हटवण्यासाठी विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत. लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेल्या सरकारला शोभत नाही. ज्या मतदारांनी तुम्हाला सत्तेत बसवले, त्यांच्या मताला किंमत देत नसाल तर त्यांचा उद्रेक होणारच…
गेल्या महिन्यात ट्रम्प प्रशासनाच्या विरोधात ८० लाख लोक जेव्हा रस्त्यावर उतरले, त्याच दिवशी ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या पराभवावर शिक्कामोर्तब झाले होते. ट्रम्प आपल्याला आणखी एक टर्म मिळेल म्हणून आशावादी होते, त्यासाठी त्यांनी प्रयत्न देखील सुरु केले होते. अमेरीकेच्या कायद्यानुसार एका व्यक्तीला केवळ दोनदा राष्ट्राध्यक्ष होता येते. त्यामुळे आपले प्रयत्न यशस्वी होऊ शकणार नाहीत, हे लक्षात आल्यानंतर आपल्याला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळावा, यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले. त्यासाठी त्यांनी पाकिस्तान व भारत या त्यांच्या भाटाना कामाला लावले. पण, येथेही त्यांना तोंडघशी पडावे लागले. या सर्व घडामोडीनंतर ट्रम्प जाहीरपणे म्हणाले, ” अमेरिकन जनतेला इराण विरोधात केलेले युद्ध मान्य नव्हते, त्यांनी तो रोष मतपेटीतून व्यक्त केला.” या सर्व घडामोडीवरून एकच निष्कर्ष निघतो, तो म्हणजे लोकशाही व्यवस्थेत एकाधिकारशाहीला लोक कदापि थारा देत नाहीत.

