दीपक मोहिते,
घडलंय बिघडलंय,
वातावरण बदलत चालल्यामुळे फडणवीस कासावीस,
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चर्चेत राहण्यासाठी काहीही करतात, हे आजवर अनेकदा आपल्याला अनुभवायला मिळाले. काल त्यांनी देशात विरोधक रिजीम चेंज करण्यासाठी अराजकता निर्माण करत आहेत, असा आरोप करत भाजपतर्फे मोर्चा काढला. त्यांच्या या मोर्चावर राज ठाकरे यांनी चांगलेच तोंडसूख घेतले.” अरे तुम्ही सत्तेत असताना आपल्याच सरकार विरोधात मोर्चे कसले काढता ? ” असा प्रश्न उपस्थित केला.भाजप उद्यापासून राज्यभरात मोर्चे काढणार आहे. दोन दिवसापूर्वी त्यांनी ठाण्यात पदयात्रा काढली होती.
*वास्तविक भाजप हा सत्तेत असताना त्यांना आपल्याच सरकारविरोधात मोर्चे काढण्याची त्यांच्यावर पाळी यावी, ही एकप्रकारची शोकांतिका आहे. देश व राज्यातील सत्ता तुमच्या हाती एकवटली असताना त्यांनी मोर्चे काढावे, हे केवळ हास्यास्पदच आहे. ” रिजीम चेंज, ” या दोन शब्दाची भाजपला इतकी भिती का वाटावी ? २०१४ पूर्वी भाजप, ” रिजीम चेंज,” करण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत असत. आज त्यांना या दोन शब्दाची इतकी भिती का वाटावी ? फडणवीस हल्ली संविधानाविषयी बरंच काही बोलत असतात. त्यांना संविधानाची आता काळजी वाटू लागली आहे. चांगली गोष्ट आहे, भाजप आजवर संविधान मानायला तयार नव्हते, आज त्यांचे मुख्यमंत्री संविधान वाचवण्याची भाषा करू लागले आहेत. परंतु हे करताना विरोधकावर जे आरोप करत आहेत, ते निव्वळ भितीपोटी होत आहेत. देश व राज्यात राजकीय वातावरण झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे फडणवीस सध्या बेताल वक्तव्ये करत आहेत. विधान परिषदेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीत त्यांच्या महायुतीला पदवीधर मतदारांनी चांगलाच दणका दिला. तसेच कोल्हापूरच्या गोकुळमध्येही महायुतीला सतेज पाटलानी यशस्वीपणे रोखले. परंतु आपला पराभव मान्य करण्याऐवजी फडणवीस यांनी मागच्या दाराने सत्ता मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. आपल्या पराभवाच्या भितीने फडणवीस व त्यांच्या कंपूचा संयम आता सुटत चालला आहे.सत्तेत राहून मोर्चा काढणारे देवेंद्र फडणवीस हे कदाचित पहिलेच मुख्यमंत्री असावेत.

