दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
नालासोपारा नागरिकांचे पलायन ; यापूर्वी असं कधीच घडलं नव्हते…
दोन दिवसापूर्वी नालासोपारा शहराच्या पूर्व भागात जे काही घडलं त्याची तुलना मणिपूर येथे घडत असलेल्या घटनेशी केल्यास ते वावगे ठरू नये. प्रचंड दहशतीखाली असलेल्या श्रीरामनगर भागातील अनेक नागरिकांनी नेसत्या कपड्यांनीशी आपल्या बायका मुलासह पळ काढला व आपला जीव वाचवला. सदर बाब स्थानिक पोलीस, राज्याचे गृहविभाग व ज्यांच्यावर या विभागाची जबाबदारी आहे, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नक्कीच लांछनास्पद आहे. यापूर्वी ” दहशतीला घाबरून लोकांचे पलायन,” असं कधीच घडलं नव्हतं, त्यामुळे महायुती सरकारने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
शहरातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडवणारे हे गुंड कोण आहेत. याचा शोध घेण्याचे आव्हान पेल्हार पोलिसासमोर आहे. पोलिसाकडे तक्रार करून काहीही होत नाही. कारण या शहरात पोलीस, राजकारणी व गुंड या तिघांची अभद्र युती झाली आहे. येथील नागरिकांनी घटना घडल्यानंतर पोलीस ठाणे गाठण्याऐवजी थेट मुंबई गाठली,यावरून पोलीस यंत्रणेवरून सर्वसामान्य लोकांचा विश्वास पार उडाल्याचे स्पष्ट होत आहे. आज हे शहर ज्वालामुखीच्या तोंडावर वसले आहे. वारंवार होणाऱ्या हत्या, अमली पदार्थांची सरेआम विक्री, लव जिहाद, बलात्कार व अपहरण अशा घटनानी परिपूर्ण अशा या शहरावर हळूहळू माफियाचे वर्चस्व निर्माण होत आहे.* *आश्चर्याची गोष्ट अशी कि या ज्वलंत समस्येविषयी लोकप्रतिनिधी मूग गिळून बसले आहेत. उठसुठ मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेणाऱ्या आमदारांना या समस्येचे गांभीर्य कळू नये, यासारखे दुसरे दुर्देव नसावे. या लोकप्रतिनिधीच्या नाकर्तेपणामुळे आज श्रीरामनगर मधील रहिवाश्यावर विस्थापित होण्याची पाळी आली आहे. पोलीस व लोकप्रतिनिधी यांच्या निष्क्रियतेमुळे नालासोपारा शहरातील नागरिकांना जगणे कठीण होऊन बसले आहे. अशा भितीपोटी लोक दुसरीकडे स्थलांतरित होऊ लागले तर ते आपल्या लोकशाही व्यवस्थेला हानिकारक ठरू शकते.मणिपूरमध्ये जे काही घडत आहे, त्याचे मूळ जातीपातीच्या राजकारणात दडले आहे. तशी परिस्थिती या शहरात नाही, येथे गुंडगिरी चढत्या कमानीवर आरुढ झाली आहे. येथे गुण्यागोविंदाने राहणारे मजूर, रिक्षावाले, भाजी विक्रेते जर अशाप्रकारच्या दहशतीला बळी पडत असतील तर ते माणुसकीला काळिमा फासणारे आहे. राज्याच्या गृहविभागाने येथील पोलीस प्रशासनाची झाडाझडती करण्याची आवश्यकता आहे. यापूर्वी अशाप्रकारची घटना कधीच घडली नव्हती. आपण आशा करूया कि तशी ती पुन्हा घडता कामा नये.

