दीपक मोहिते,
” फ्रंटलाईन,”
…आता सुशिक्षित तरुणांनी पुढे यायला हवे,
वसई व नालासोपारा मतदारसंघाच्या मतदारांनी गेल्यावर्षी न भूतो न भविष्यती असे परिवर्तन घडवून आणले, त्यानंतर झालेल्या वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीत याच मतदारांनी बहुजन विकास आघाडी व भाजपला ५७ व ४३ % जागा निवडून दिल्या. ( बहुजन विकास आघाडी – ७१, भाजप – ४३ व शिवसेना शिंदे गट- ०१ ) पण हे दोन्ही पक्ष मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरू शकले नाहीत. गेल्या आठ महिन्यात या महानगरपालिकेत सध्या जे काही चालले आहे. त्यावरून हे दोन्ही पक्ष मतदारांच्या मनातून साफ उतरले आहेत.
या दोन्ही मतदारसंघात विकासाचे अनेक प्रश्न गेल्या ४० वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यामध्ये पाणी, आरोग्य, शिक्षण व वैद्यकीय सेवा, या प्रमुख पायाभूत सुविधांचा समावेश आहे. या महागरपालिकेकडून गेल्या १७ वर्षात स्वतःचे एक अद्ययावत हॉस्पिटल उभे राहू शकले नाही. त्यामुळे खाजगी रुग्णालयानी येथील नागरिकांची अक्षरशः लूट केली. महानगरपालिकेचा स्वतःचा वैद्यकीय विभाग आहे. परंतु तो मृत्यूशय्येवर निपचित पडून आहे, क्षणाक्षणाला तो अखेरच्या घटका मोजतोय. ज्या लोकप्रतिनिधीना आपल्या मतदारसंघात सरकारी रुग्णालय उभारता आले नाही, त्यांना कार्यसम्राट,संघर्षकन्या विकास पुरुष अशी बिरूदे त्यांचे अंधभक्त लावत असतात. हे या ऐतिहासिक नगरीचे दुर्देवच म्हणावे लागेल. अपूर्ण असलेल्या विकासकामाचे श्रेय ओरबडण्यासाठी जी हमरी – तुमरी आपण पाहिली, ती तुम्हाला आम्हाला शरमेने मान खाली घालायला लावणारी होती. केवळ रिल्स बनवणे, अमुक अमुक विकासकामांना मंजुरी मिळाली, अशी प्रसिद्धी पत्रके काढणे, आपल्या सोबत अंधभक्त व युट्युबर्सना घेऊन पाहणी दौरे करणे, असे विदारक चित्र पाहण्याचे तुमच्या आमच्या नशिबी आले आहे. महानगरपालिकेत कचऱ्याच्या निविदावरून जे काही रणकंदन सुरु आहे, ते या ऐतिहासिक नगरीला शोभेसे नाही. प्रत्येक राजकीय नेता, पदाधिकारी व कार्यकर्ता “आपल्याला काहीतरी मिळायला हवे,” म्हणून धडपडत असतो. मोठ्या निविदाच्या प्रकरणात सत्ताधारी व विरोधक हे दोघेही ” आपण दोघे भाऊ, एकत्र येऊन वाटून खाऊ,” अशा भूमिकेत असतात. ९०० कोटी रु. च्या निविदेमध्ये सध्या काय चालले आहे ? याचा मागोवा घेतला असता, मतदारांनी विश्वास तरी कोणावर ठेवावा ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्यांना परिसराचा विकास करण्यासाठी आम्ही महानगरपालिकेत पाठवले ते आता या शहराचे लचके तोडण्यात मशगुल आहेत. त्यामुळे सुशिक्षित तरुणांनी आता पुढे आले पाहिजे, जेणेकरून तुमच्या आमच्या पैश्याची लूट थांबू शकेल. आज वसई, विरार, नालासोपारा व नवघर – माणिकपूर या चार महानगराला जो बकालपणा आला आहे, त्याचे मूळ या महानगरपालिकेतील भ्रष्टाचारात दडले आहे..

