दीपक मोहिते,
डहाणू : कॉ. विनोद निकोले,
राज्यातील सर्वात गरीब लोकप्रतिनिधी : आ.कॉ. विनोद निकोले,
डहाणूचे आ. कॉ. विनोद निकोले हे विद्यार्थी दशेपासून राजकारणात सक्रिय आहे. सुरुवातीला डिवायएफआय या विद्यार्थी संघटनेमध्ये सक्रिय होते.त्यानंतर सिटूमध्ये ठाणे – पालघर जिल्हा सचिव, मग महाराष्ट्र सिटूचे राज्य सचिव आणि माकप राज्य समिती सदस्य व सध्या, विधानसभा सदस्य. २०१८ साली नाशिक – मुंबई किसान लॉंग मार्चमध्ये सहभागी झाले होते.
२०१३ – १५ दरम्यान आदिवासीच्या जमिनी व कामगार आंदोलनात त्यांच्यावर असंख्य गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांना पाच जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले.पण प्रशासनाच्या या आदेशाविरोधात सुमारे २५ हजार शेतकऱ्यांनी डहाणू पोलीस ठाण्याला घेराव घातला त्यामुळे पोलीस प्रशासन नमले व हद्दपारीचा आदेश रद्द करण्यात आला.
२०१९ साली त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली.या निवडणुकीत त्यांनी पास्कल धनारे यांचा १६ हजार मतांनी पराभव केला.त्यानंतर २०२४ च्या निवडणुकीत त्यांनी भाजपचे विनोद मेढा यांना ५ हजार १३३ मतांनी पराभव केला. आपल्या या राजकीय वाटचालीत त्यांनी आपली प्रतिमा सर्वसामान्य लोकांचा प्रतिनिधी म्हणून निर्माण केली तसेच ” कमिशन न घेणारा महाराष्ट्रातील एकमेव आमदार, ” अशी ओळख आहे.ही ओळख त्यांनी आजतागायत जपली आहे.राज्यात ९३ % आमदार करोडपती असताना निकोले यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात वाकी येथे आपले राहते घर केवळ ४६ लाखाचे असल्याचे दाखवले. शोषणाविरुद्ध लढा व शासनाचे अनेक योजना लोकांपर्यंत पोहोचवणे,असे उद्दिष्ट आपल्या डोळ्यासमोर ठेवले. आदिवासीच्या वनजमिनी, गायरान व कसलेल्या जमिनीवरचा हक्क व वाढवण बंदर विरोधात आदिवासीचा लढा उभारणे, डहाणूत प्रथम श्रेणीचे हॉस्पिटल उभारणे, यासाठी त्यांनी अविरत संघर्ष केला व आजही करत आहेत. दररोज सकाळी डहाणू येथील कार्यालयात आपल्या प्लास्टिकच्या खुर्चीवर बसून नागरिकांच्या तक्रारी ऐकणे,हाच त्यांचा प्रचार आहे. ” मी पैसे वाटू शकत नाही, माझ्याकडे सोशल मिडिया नाही,” माझे भांडवल जमिनीवर राहणे व लोकांच्या दैनंदिन जीवनाशी एकरूप राहणे आहे, असे ते सतत म्हणत असतात.पालघर जिल्ह्यातील सर्व आमदार कोट्याधीश असताना कॉ. विनोद निकोले राज्यात अत्यंत गरीब आमदार म्हणून ओळखले जातात. आदिवासीच्या समस्या व प्रश्न सुटावेत, यासाठी दिवसरात्र झटणारा हा एकमेव आमदार आहे. त्यांच्या या गुणामुळे स्थानिक प्रशासन देखील कायम वचकून असते.

