दीपक मोहिते,
आ. राजेंद्र गावित यांची कारकीर्द बेताचीच राहिली,
मूळचे नंदुरबारचे असलेले गावित, हे कालांतराने मिरा रोड स्थायिक झाले. राजकारणाची आवड असल्यामुळे त्यांनी त्यावेळी असलेल्या ठाणे जिल्ह्यातील विधानसभा उमेदवारीसाठी अनेक तालुक्याची चाचपणी केली. अखेर त्यानी पालघर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवली. या तालुक्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अस्तित्व अगदी नगण्य होते. तरीही त्यानी ही निवडणूक लढवली. काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यानी त्यांच्या विरोधात या विधानसभा निवडणुकीत उपरा उमेदवार म्हणून छुपा प्रचार केला. त्यामुळे सेनेच्या मनिषा निमकर पुन्हा निवडून आल्या. पराभव झाल्यानंतरही गावित हे पायाला भिंगरी लावल्यागत तालुकाभर फिरले व त्यांनी तालुक्याच्या प्रत्येक गावांत स्वतःच्या कार्यकर्त्यांची फळी उभारली. त्यानंतर २००९ साली पुन्हा निवडणूक लढवली व त्यांना मतविभागणीचा फायदा मिळाला व मनिषा निमकर पराभूत झाल्या. जिल्ह्यात काँग्रेसचा एकमेव एकमेव आदिवासी उमेदवार असल्यामुळे त्यांना पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपद मिळाले. त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही.त्यानंतर
त्यांची राजकीय वाटचाल अशी झाली.
१ ) कॉंग्रेस काळ (२००० – २०१८ ) :- २००४, व २००९ मध्ये पालघर ( अ. ज. ) मतदारसंघातून कॉंग्रेसकडून आमदार.
१९ नोव्हें.२०१० ते २८ सप्टेंबर २०१४ – पृथ्वीराज चव्हाण सरकारमध्ये राज्यमंत्री – आदिवासी विकास, कामगार, फलोत्पादन खात्याचे मंत्री,
भाजप-शिवसेनेत
पक्षांतराची मालिका –
२०१८ – कॉंग्रेसमधील सततच्या अपमानाला कंटाळून भाजपमध्ये प्रवेश. चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर झालेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपकडून खासदार म्हणून विजयी,
२०१९ – युतीचा फॉर्म्युला म्हणून शिवसेनेत (अविभाजित) प्रवेश आणि पुन्हा पालघर लोकसभा जिंकली. ( ५ लाख ८० हजार ४७९ मते, सुमारे ८८ हजार ८८३ मताधिक्य )
२०२२ – शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे गटात सामील झाले.
७ मे २०२४ – पुन्हा भाजपमध्ये सामील. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत घरवापसी झाली.
२०२४ साली पालघर विधानसभा मतदारसंघातून शिवसेने ( शिंदे गट ) कडून निवडून आले – १ लाख १२ हजार ८९४ मते ( ५३.७७ % ) ठाकरे गटाचे जयेंद्र दुबळा ( ७२ हजार ५५७ मते ) यांचा ४० हजार ३३७ मतांनी पराभव.
त्यांना एकाच वर्षात तीन पक्ष बदलणारे उमेदवार म्हणूनही ओळखले जाते.
या संपूर्ण राजकीय वाटचालीत त्यांनी पालघर जिल्ह्याच्या विकासाकडे कधीही लक्ष दिले नाही. वसई विरार शहर मनपातील गावाचा मुद्दा हा त्यांच्या कारकिर्दीतील कळीचा मुद्दा बनला होता. पण त्यावर ते तोडगा काढू शकला नाही. त्यामुळे हे प्रकरण अद्याप मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तसेच वाढवण व मुरबे बंदर, टेक्स्टाईल पार्क इ. प्रस्तावित प्रकल्पाबाबत त्यांची भूमिका कायम संशयास्पद राहिली. अलीकडच्या काळात प्रकृती संदर्भात अनेक समस्या निर्माण झाल्यामुळे त्यांनी आपला मुलगा रोहित गावित याला राजकीय वारस म्हणून पुढे आणले. त्याला जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळवून दिली, पण त्याला पराभव पत्कारावा लागला. आज त्यांचा मुलगा एका मारहाण प्रकरणात गेल्या दोन महिन्यापासून जेलची हवा खात आहे.
या प्रकरणाचा घटनाक्रम :
५/६ सप्टें. २०२६ रोजी पहाटे, पालघरमधील रिलिफ हॉस्पिटल नजीक दहीहंडी उत्सवात जखमी झालेल्या ‘गोविंदा’ पथकातील तरुण रिलीफ हॉस्पिटलच्या आयसीयुमध्ये दाखल होते. हॉस्पिटलने जास्त बिल लावले, असा आरोप करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलच्या स्टाफवर हल्ला केला. हॉस्पिटलची तोडफोड, डॉक्टरांना धमक्या, कर्मचाऱ्याला मारहाण केली आणि आयसीयू मधून जबरदस्तीने एका जखमी गोविंदाला उचलून नेणे. सुरुवातीला १७ जणांवर गुन्हा, नंतर संख्या २२-२३ पर्यंत गेली. यामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे, शहरप्रमुख राहुल घरत ( ७ सप्टें.रोजी अटक, पक्षातून निलंबित ) यांची नावे होती.
११ सप्टें. २०२६ रोजी रोहित गावितला मिरा रोड येथील घरातून अटक करण्यात आली.पोलिसांनी सांगितले की त्याने नवीन सिम कार्ड जुन्या फोनमध्ये टाकल्यामुळे टेक्निकल ट्रॅकिंगने लोकेशन मिळाले. त्याच दिवशी ९ गोविंदा आणि साईराज पाटील (युवा सेना) यांनाही अटक
पालघर सत्र न्यायालयाने १३ सप्टें.पर्यंत पोलीस कोठडी, नंतर ती १६ सप्टें.पर्यंत वाढवली.
मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती ए. एस. गडकरी आणि कमल खाता यांच्या खंडपीठाने पोलीस तपासाला ” हास्यास्पद आणि गंभीर त्रुटीपूर्ण,” असे म्हटले. पालघर पोलिसांची कारवाई वरवरची असून आरोपींना फायदा मिळवून देणारी वाटते, असे सांगून कोकण विभागाच्या अतिरिक्त महानिरीक्षकांना तपासाची चौकशी करून १७ सप्टें.पर्यंत अहवाल देण्याचे आदेश दिले होते.
३० सप्टें. २०२६ रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सुजाता बांदल यांनी रोहित गावितसह ६ जणांचा जामीन अर्ज फेटाळला. बचाव पक्षाचा युक्तिवाद होता की ते फक्त प्रेक्षक म्हणून होते, आयसीयूमध्ये गेले नाहीत.पण न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. नुकत्याच झालेल्या सूनावणीमध्ये बारा जणांची जामिनावर मुक्तता केली. उर्वरित अकरा जणांना पुन्हा न्यायालयीन कोठडी दिली. या अकरा जणांमध्ये कुंदन संख्ये, रोहित गावित व राहुल घरत यांचा समावेश आहे.
सध्या या प्रकरणाचा तपास कोकण पोलीस महानिरीक्षक यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.
अनेक महत्वाची पदे मिळुनही त्यांना नजरेत भरतील अशी विकासकामे करता आली नाहीत. वास्तविक त्यांना लोकसभेची उमेदवारी देणे मुळात चुकीचे होते. ते लोकसभेच्या कामकाजात आपला ठसा उमटवू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना शिंदे यांनी पालघर विधानसभेची उमेदवारी दिली, ते निवडूनही आले. पण गेल्या वर्षभरात त्यांना आपला प्रभाव दाखवता आला नाही. त्यामुळे आजही पालघर तालुक्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.

