दीपक मोहिते,
” घडलंय बिघडलंय,”
झाडांची कत्तल ; राज्य सरकार अस्मानी संकटाला आमंत्रण देतेय…
*जगभरात ओझोन व पर्जन्यमानाचे प्रमाण सतत कमी होत चालले आहे. त्यामुळे पृथ्वीवरील सजीवाना आता सभोवतालच्या बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घ्यावे लागत आहे. ज्या सजीवाना आपल्यामध्ये बदल घडवण्यात यश मिळते, ते तग धरून राहतात व ज्याना ते शक्य होत नाही,अशाना आपले प्राण गमवावे लागतात.ही स्थिती का निर्माण झाली ? यावर जगभरात गेल्या शंभर वर्षात आंतरराष्ट्रीय स्तरावर लाखोकार्यशाळा,चर्चासत्रे,उपक्रम पार पडले, परंतु पर्यावरणाचा होत असलेला विनाश मात्र रोखणे,एकाही देशाला शक्य झाले नाही.
आज आपल्या राज्यात विविध प्रकल्पासाठी मोठ्याप्रमाणावर झाडांची कत्तल होत आहे. पालघर व रायगड जिल्ह्यात हा प्रकार सर्रास चालू आहे. येथे दोन प्रकल्पासाठी सुमारे ७१ हजार झाडे तोडण्यात येत आहेत. त्याबदल्यात संबंधित कंपन्या ९० हजार झाडे लावणार आहेत, असा सरकार दावा करत आहे. पण सरकारच्या या दाव्यात बिलकुल तथ्य नाही. आजवर अनेक प्रकल्पासाठी प्रचंड वृक्षतोड झाली. पण झाडे काही लावण्यात आली नाहीत.पर्यावरणाच्या अशा अधोगतीने संपूर्ण जग आता विनाशाच्या उंबरठ्यावर येऊन उभे ठाकले आहे. त्सुनामी,दर सहा महिन्यानी आदळणारी विविध वादळे व पाचवीला पूजलेला दुष्काळ. हे सारे केवळ विकासाच्या नावाखाली मानवजातीने घातलेल्या धूमाकुळाचा परिणाम आहे.जलप्रदूषण व हवेतील प्रदुषणास केवळ आपणच जबाबदार आहोत.वायुमंडळात प्राणवायुचा विपुल साठा असतो, हे वायुमंडळ पृथ्वीभोवती आवरणाच्या रुपात असते,ते उष्ण व हानिकारक किरणांपासून भूतलावरील सजीवांचे रक्षण करत असते. परंतु मानवाच्या चुकांमुळे हे वायुमंडळ आता विस्कळीत होवू लागले आहे. प्रचंड वृक्षतोड़,नदीचे पात्र बदलणे, विषारी द्रव्ये समुद्र व नदीपात्रात सोडणे,अशा कारणांमुळे पर्यावरणाचे संतुलन दिवसेंदिवस अस्ताव्यस्त होत आहेच. परंतु गावच्या गावे अवर्षणग्रस्त होत आहेत.भूजल पातळी सतत खाली जात आहे,यामागे वनक्षेत्रातील वृक्षसंपदेची हानी हेच एकमेव कारण आहे. झाडांच्या मुळांमध्ये जमिनीतील पाणी धरून ठेवण्याची प्रचंड क्षमता असते. त्या क्षमतेवरच मानवाने घाला घातल्यामुळे जमिनीखाली असलेले पाण्याचे स्त्रोत व साठे कमी होत गेले.
हे सारे केवळ ” विकास,” या एकमेव गोंडस नावाखाली सुरु आहे. विकास हा व्हायलाच हवा परंतु तो स्वत:चाच ” विनाश,” करून नकोय..हे जोवर मानवाला उमगणार नाही,तोवर निसर्गाचा प्रकोप असाच होत राहणार. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी राज्यातील सुमारे ३०५ तालुक्यात दुष्काळ निर्माण झाल्याचे जाहीर केले आहे.दुष्काळाची दाहकता स्पष्ट करताना त्यानी काही तात्पुरत्या स्वरूपातील उपाययोजनाची माहिती दिली. त्यामध्ये विद्यार्थ्यांची फि,वीजबिलात सवलत,गुराना चारा व अन्य ८ ते १० सवलती जाहीर केल्या आहेत.या सवलती देणे म्हणजे उपाययोजना करणे असे होत नाही,अशी स्थिती वारंवार येता कामा नये, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे, त्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करून त्याची प्रभावीपणे अमलबजावणी करणे आवश्यक ठरते.याउलट सरकार धनदांडग्याच्या प्रकल्पासाठी वृक्षसंपदा नष्ट करण्यास सरसकट परवानग्या देत सुटले आहे.त्याचे वाईट येणाऱ्या पिढीला भोगावे लागणार आहेत.

