दीपक मोहिते,
” राजकीय उलथापालथी,”
५०० कोटींचा आरोप ; रामदास कदम यांचा शिंदेची सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न,
जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ५०० कोटीच्या व्यवहार प्रकरणी आरोप केल्यानंतर रामदास कदम चांगलेच पिसाळले. एवढे पिसाळले कि त्यांना आपण काय बरळत आहोत, याचे भान देखील राहीले नाही. आज त्यांनी शिंदे यांची भेट घेऊन माझ्याशिवाय इतर कोणीही तुमची बाजू भक्कमपणे मांडली नाही, अशी शेखी मिरवली. त्यावर शिंदे कसे रिऍक्ट झाले ते मात्र कळू शकले नाही.
बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेले रामदास कदम हे गेल्या दहा वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून बाहेर फेकले गेले आहेत. बाळासाहेबांच्या जाण्यानंतर पक्षाची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी नारायण राणे, मनोहर जोशी, रामदास कदम व अन्य काही नेत्यांना एकेक करून दूर सारले. मनोहर जोशी हे वयोमानामुळे सक्रिय राजकारणापासून दूर झाले. नारायण राणे यांची अवस्था मात्र अगदी दयनीय झाली. काँग्रेसमध्ये त्यांची डाळ शिजू शकली नाही. दोन ते तीन वर्षे त्यांची राजकारणात कुठे तरी स्थिर व्हावे, यासाठी धडपड होत राहीली. अखेर त्यांचे बस्तान भाजपमध्ये बसले. दुसरीकडे रामदास कदम हे जवळपास राजकीय विजनवासातच गेले. २०२२ मध्ये शिंदे यांनी बंड केले व रामदास कदम यांना सोनियाचे दिवस आले. ज्येष्ठ नेते म्हणून शिंदे यांनी त्यांना व गजानन कीर्तिकर या दोघांना सोबत घेतले व कदम यांचे चिरंजीव योगेश कदम यांना राज्यमंत्री केले. आज रामदास कदम शिंदे यांच्या बाजूने तावातावाने भांडतात ते केवळ शिंदे यांनी केलेल्या उपकाराची उतराई करण्यासाठी आहे.
रामदास कदम हे खेड मतदारसंघातून चार वेळा निवडून गेले. विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी काम पाहिले. मात्र पर्यावरणमंत्री म्हणून त्यांना प्रभावीपणे काम करता आले नाही. अनेकदा त्यांच्यावर विविध आरोप झाले. सेनेत उद्धव ठाकरे यांचा बोलबाला सुरु झाल्यानंतर कदम यांच्या राजकारणाला उतरती कळा लागली व ते बाजूला फेकले गेले. त्यांच्याच खेड मतदारसंघात त्यांना निवडणूक लढवणे शक्य झाले नाही. २०१९ साली त्यांचा मुलगा योगेश कदमला दापोली. मतदारसंघातून उमेदवारी मिळाली व ते विजयी झाले. २०२४ मध्ये पुन्हा याच मतदारसंघातून ते पुन्हा निवडून आले व राज्यमंत्री झाले. रायगड जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे व रामदास कदम यांचे एकमेकांशी हाडवैर आहे. गेली २५ वर्षे हे वैर असून कदम यांच्या राजकारणाला त्याचा चांगलाच फटका बसला.
तीच परंपरा त्यांचे चिरंजीव व राज्याचे गृहराज्यमंत्री असलेले योगेश कदम सध्या राबवत आहेत. सप्टेंबर २०२६ मध्ये रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत योगेश कदम यांनी सुनील तटकरे यांची भेट टाळून पाठ फिरवली. एकाच वेळी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसला अंगावर घेणारे हे पितापुत्र अनेकदा चांगलेच अडचणीत आले. दापोली नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर भाजपने त्यांना थेट लक्ष्य केले.दापोली – दाभोळ मार्गावरील टपऱ्या हटवणे,वक्फ बोर्ड जमीन प्रकरणावर भाजपचे सूर्यकांत दळवी व केदार साठे यांनी त्यांच्यावर पत्रकार परिषद घेऊन तोफ डागली.त्यानंतर गृहराज्यमंत्री म्हणून योगेश कदम यांनी पुणे पोलिसांनी नाकारलेला शस्त्रपरवाना पुण्यातील गँगस्टर निलेश धायवळच्या भावाला दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला,त्यावरून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.महायुतीमध्ये असलेल्या भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या रडारवर हे पितापुत्र आहेत.त्यांचे अस्तित्व केवळ खेड व दापोली पर्यन्त मर्यादित राहीले आहे. तर रायगड जिल्हा परिषद / लोकसभा पातळीवर तटकरे, राणे व सामंत हे सर्वाधिक प्रभावी नेते आहेत.रायगड जिल्ह्यातील शिंदे गटाचे दुसरे प्रभावी नेते भरत गोगावले देखील या कदम पितापुत्रापासून दोन हात दूर राखून आहेत.

