दीपक मोहिते,
” स्पॉटलाईट,”
युरोपमधील आंदोलनामागे स्थलांतरण व बेरोजगारी ही दोन कारणे,
अनेक दशके शांत राहिलेला युरोप सध्या धुमसत आहे. या महिन्यात फ्रान्स, इटली, स्पेन, पोर्तुगाल, बेल्जियम, अल्बेनियामध्ये आंदोलने सुरू झाली आहेत. या आंदोनावर नियंत्रण आणण्यात या देशाच्या सरकारांना अद्याप यश आलेले नाही. गेल्या पंधरा दिवसात अब्जावधी रु. चे नुकसान झाले.
या आंदोलनामागे एकच कारण नाही, तर अनेक कारणांचा एकत्रित स्फोट झाला आहे.
जगण्याच्या खर्चाचा स्फोट, हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. याविषयी प्रसिद्ध झालेल्या अहवालात वाढते इंधन दर, घरभाडे परवडत नसणे, शिक्षण आणि सार्वजनिक सेवांची घसरण इ. महत्वाची कारणे आहेत. स्पेन – पोर्तुगालमध्ये तर लोकांनी भाडेवाढी विरोधात तंबू ठोकून आंदोलन केलं. तरुण पिढीला वाटतंय की सध्याचे सोशल मॉडेल फेल झाले आहे आणि सरकारचे वर्तमान व भविष्यावर बिलकुल नियंत्रण नाही.
युक्रेन युद्धामुळे झालेले सर्वात मोठे स्थलांतर हे
दुसऱ्या महायुद्धानंतरचे युरोपमधील सर्वात मोठे विस्थापन आहे. २०२५ अखेरपर्यंत ५९ लाख युक्रेनियन निर्वासित जगभरात होते, त्यापैकी ५० लाखांहून अधिक लोक फक्त युरोपमध्ये आहेत.
याशिवाय सीरियन, अफगाण निर्वासित आधीपासून होते. २०२२ पासून लाखो लोक आल्यामुळे अनेक देशांमध्ये घर, शाळा, आरोग्य सेवा यावर प्रचंड ताण आला आहे. विशेषतः मध्य-पूर्व युरोपातील देश जे आधी निर्वासितांसाठी मोठे डेस्टिनेशन नव्हते. त्यांना सध्या चांगलीच झळ बसत आहे. फ्रान्स, इटली, स्पेन या देशामध्ये लवकरच निवडणुका होत आहेत, तर जर्मनीमध्ये अतिउजव्या पक्षांना यश मिळत आहे. या काळात प्रत्येक राजकीय गट या असंतोषाला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
युरोपियन युनियनमध्ये अनियमित स्थलांतर २०२५ च्या पहिल्या १० महिन्यात १ लाख ५२ हजार इतके होते, जे २०२४ च्या तुलनेत २२ % कमी आहे, पण तरीही राजकीय दबाव वाढत आहे. २०२६ मध्ये समुद्रमार्गे होणारे स्थलांतर हे ३५% ने कमी झाले आहे.
ग्लोबल पीस इंडेक्स च्या अभ्यासानुसार, स्थलांतराला विरोध करण्यामागचे मुख्य कारण सुरक्षा किंवा दहशतवाद नाही, तर घरांची टंचाई, वाढता खर्च आणि सार्वजनिक सेवांवरचा ताण ही आहेत. त्यामुळेच अनेक पारंपारिक मध्यम-उजवे पक्ष सुद्धा आता कडक स्थलांतरण धोरण स्विकारु लागले आहेत, जेणेकरून मतदार अतिउजव्या पक्षांकडे जाऊ नयेत.
युरोपचा जन्मदर खूप कमी आहे, अनेक देशांमध्ये कामगारांची टंचाई आहे. स्थलांतरित लोक व्यवसाय सुरू करणे, कर भरणे, नोकऱ्या भरणे याद्वारे अर्थव्यवस्थेत योगदान देत असतात.
ग्रीस, नेदरलँड्स सारखे देश आता सीमाव्यवस्थापन आणि आश्रय यात फरक करून, मोठ्या गर्दीच्या वेळी आश्रय तात्पुरता स्थगित करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करत आहेत.पण त्याच वेळी युरोपियन युनियनने जून २०२६ पासून नवीन मायग्रेशन पॅक्ट लागू केला आहे. स्थलांतर हे एकमेव कारण नाही. युरोपची आत्ताची अस्थिरता ही महागाई, घरांचा प्रश्न, युद्धामुळे आलेले कोट्यवधी निर्वासित, शिक्षण-आरोग्य सेवांवरचा ताण, राजकीय फायदा घेण्याची स्पर्धा, या सगळ्यांचा एकत्रित परिणाम आहे.
फ्रेंच पोलिसांनी स्पष्ट केले आहे की सध्याच्या हिंसाचारासाठी स्थलांतरितांना आम्ही जबाबदार धरलेले नाही, तरी काही राजकीय नेते त्याचा तसा वापर करत आहेत.
आज या देशात ज्या दंगली व आंदोलने होत आहेत. त्यामागे गरीबी, बेरोजगारी, सततची युद्धसदृश्य परिस्थिती व त्यातून होणारे स्थलांतरण अशी स्फ़ोटक कारणे आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्रान्स मधील दंगलीमागे इस्लामिक दहशतवाद असल्याचे म्हंटले आहे. ही आंदोलने आटोक्यात येण्याऐवजी त्याची व्याप्ती वाढताना दिसत आहे.

