दीपक मोहिते,
विशेष सखोल पुनरीक्षण अंतर्गत कामकाजाचा आढावा,
महाराष्ट्र राज्याचे अप्पर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य एस. चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली शनि.२४ ऑक्टो.२०२६ रोजी वसई-विरार शहर महानगरपालिका मुख्यालयात पालघर जिल्हा तसेच वसई-विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने संबंधित निवडणूक यंत्रणेच्या कामकाजाबाबतची आढावा बैठक संपन्न झाली.
या बैठकीत मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी पालघर जिल्हा आणि वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या कामकाजाची सविस्तर माहिती जाणून घेतली. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची सद्यस्थिती, मतदारयादी पुनरीक्षणाशी संबंधित कामकाज, दावे व हरकती दाखल करण्याच्या टप्प्यात प्रलंबित नमुने तसेच मतदारांना बजावण्यात येणाऱ्या नोटिशीं बाबतची माहिती, क्षेत्रीय स्तरावर सुरू असलेल्या कार्यवाहीचे नियोजन आणि विविध प्रशासकीय बाबींचा आढावा यावेळी घेण्यात आला. नवीन मतदाराची नोंदणी, मयत व दुबार नोंद झालेल्या मतदारांची नावे वगळणे, तसेच कायम स्थलांतर झालेल्या मतदारांच्या बाबत आवश्यक ती कार्यवाही करणे, मतदाराच्या नावातील किंवा इतर तपशिलातील दुरुस्ती, पत्ता बदलणे, मतदार ओळखपत्राची बदली किंवा दिव्यांगत्वाची नोंद करणे इ. बाबत कामकाजाचा आढावा घेऊन आवश्यक ते निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी यांचेतर्फे संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. मतदार यादीतील नोंदींची पडताळणी करणे, पात्र मतदारांची नावे योग्य प्रकारे समाविष्ट असल्याची खात्री करणे तसेच नियमानुसार आवश्यक दुरुस्त्या व अद्ययावतकरणाची प्रक्रिया पार पाडणे, यासारख्या बाबीं तसेच प्राप्त होणाऱ्या अर्जांची व कागदपत्रांची छाननी तसेच निर्धारित वेळापत्रकानुसार कामकाज पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना यावेळी महोदयांनी उपस्थित अधिकारी वर्गाला देण्यात आल्या.
या बैठकीस जिल्हाधिकारी पालघर श्रीम.इंदुराणी जाखड, आयुक्त वसई विरार शहर महानगरपालिका श्री.पृथ्वीराज बी.पी., उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी पालघर जी.जे.गोरे, सर्व मतदार नोंदणी अधिकारी व सर्व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी ( विधानसभा मतदारसंघ बोईसर -१३१, नालासोपारा-१३२, वसई -१३३ ) तसेच इतर संबंधित अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

