दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
नालासोपाऱ्याचा बकालपणा कायम, आमदार निष्क्रिय
१३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघ हा विविध कारणामुळे सतत चर्चेत असतो. या मतदारसंघाची निर्मिती होऊन दीड दशकाचा काळ लोटला, पण येथील नागरिकांना अद्याप मोकळा श्वास घेता आला नाही, तसेच शहराचा बकालपणाही दूर होऊ शकला नाही. अनधिकृत बांधकामे, फेरीवाले, रिक्षा, अमली पदार्थाची बेसुमार विक्री, हत्या, अपहरण, लव जिहाद, बलात्कार, चोऱ्या व खंडणी वसुली असे गैरप्रकार येथील नागरिकांच्या पाचवीला पुजली आहेत. पायभूत सुविधाचा अभाव ( पाणी टंचाई, कचरा निर्मूलन, वाहतूककोंडी, अनधिकृत फेरीवाले व रिक्षावाले व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा मनमानी व भ्रष्ट कारभार ) अशा कारणामुळे नागरिक त्रस्त आहेत.
या विधानसभा मतदारसंघातून २००९, २०१४ व २०१९ असे सलग तीन वेळा माजी आ. क्षितिज ठाकूर निवडून गेले. मात्र त्यांच्या पंधरा वर्षाच्या काळात या मतदारसंघाने कात टाकली नाही. भूमिपूजने झाली, मोठ्या संख्येने नारळ फुटले, पण शहराने कधीच बाळसे धरले नाही. पण समोर पर्याय नसल्यामुळे बदल होऊ शकला नाही. मात्र २०२४ मध्ये मतदारांना भाजपच्या रूपाने पर्याय सापडला व एका साम्राज्याचे पतन झाले.भाजपचे राजन नाईक हे प्रचंड मतांनी निवडून आले.शहरवासीयांनी अक्षरशः दिवाळी साजरी केली. पण त्यांचा हा आनंद जास्त काळ टिकला नाही. आता आपल्याला सुगीचे दिवस येतील, अशा अपेक्षेत असलेल्या नागरिकांचा अवघ्या तीन महिन्यात भ्रमनिरास झाला.नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीने शहराच्या विकासाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. त्यामुळे शहराची महत्वाची प्रलंबित विकासकामे मार्गी लागू शकली नाहीत.आजही सारे प्रश्न ” जैसे थे,” स्थितीतच आहेत. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमध्ये हे शहर सलग तीन दिवस पाण्याखाली होते. लोकांना येजा करण्यासाठी ट्रॅक्टरचा आधार घ्यावा लागला. आज या शहराला ड्रग माफियाचा विळखा बसला आहे. गुन्हेगारीचा आलेख सतत वर जात आहे.लव जिहाद सारखे प्रकार वाढीला लागले आहेत. या शहरातील पोलीस यंत्रणा कुचकामी ठरली आहे. यावर वचक ठेवण्याऐवजी विद्यामान आमदार केरळची विधानसभा निवडणूक व राज्यातील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी केरळ राज्यात व सांगली येथे वेळ दवडतात.आज नालासोपारा शहर ज्वालामुखीच्या तोंडावर बसले आहे, पण लोकप्रतिनिधींना त्याच्याशी काहीही देणेघेणे नाही. त्यामुळे २०२९ च्या निवडणुकीत मतदार नक्कीच उट्टे घालतील, अशी शक्यता आहे.
टीप : उद्याचा लेख – विलास तरे

