दीपक मोहिते,
महिला बचत गटांच्या उत्पादनांची विक्रमी विक्री,
जिल्हा परिषद पालघर येथे सुरू करण्यात आलेल्या ‘उमेद मार्ट,’ ला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, सुरुवातीपासूनच येथे स्वयंसहायता महिला गटांनी तयार केलेल्या उत्पादनांची विक्रमी विक्री होत आहे. उमेद मार्ट सुरू झाल्यानंतर पहिल्या तीन दिवसांत एकूण २२ हजार रु.च्या वर विक्री झाली. त्यानंतरही विक्रीचा वेग कायम असून, पुढील दिवसात पहिल्या दिवशी १५ हजार रु, तर दुसऱ्या दिवशी १० हजार रु.ची विक्री नोंदवण्यात आली.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उमेद मार्टमध्ये विविध प्रकारचे दिवाळी फराळाचे पदार्थ तसेच सणासाठी आवश्यक असलेल्या भेटवस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. स्वयंसहायता महिला गटांनी तयार केलेले खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू आणि स्थानिक उत्पादनांसोबतच दिवाळीच्या खरेदीसाठी विविध पर्याय येथे उपलब्ध आहेत. या उपक्रमामुळे महिला गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळत असून, त्यांच्या उत्पन्नवाढीलाही हातभार लागत आहे.
नागरिकांनी दिवाळीच्या खरेदीसाठी उमेद मार्टला भेट देऊन येथील फराळ, भेटवस्तू आणि अन्य स्थानिक उत्पादनांची खरेदी करावी. स्वयंसहायता महिला गटांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हातभार लावावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांनी केले आहे.

