दीपक मोहिते,
” बॉटम लाईन,”
अरुणाचलमध्ये चीनची घुसखोरी ; आपले शौर्यदल भिडले,
भारत – चीन सीमेवर असलेल्या अरुणाचल प्रदेश या राज्यात गेल्या दोन ते वर्षांपासून उभय देशामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीच्या जवानाकडून अधूनमधून घुसखोरी करण्याच्या घटना घडत असतात.
अरुणाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागात अप्पर सुबानसिरी या जिल्ह्याच्या टाकसिग – असाफिला सेक्टर मध्ये चिनी सैनिकांनी नुकताच असा घुसखोरीचा प्रयत्न केला. भारतीय जवानांच्या नियमित गस्ती दरम्यान दोन्ही देशाचे जवान समोरासमोर आले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीचे परत आले व त्यानी आपल्या हद्दीत सुमारे ६ ते ७ कि.मी. आत तंबू ठोकले. त्यांच्या या कृतीला इंडो – तिबेट बॉर्डर पोलीस दलाने तयार केलेल्या शौर्य दलाच्या तुकडीने रोखले. त्यांच्या या कामगिरीचे महासंचालक शत्रुजित कपूर यांनी कौतुक केले. यावेळी त्यांनी गेल्या काही दिवसापासून या प्रदेशात दोन्ही देशाच्या सैन्याचा एकमेकाशी अनेकदा फेस – ऑफ झाल्याचे मान्य केलं.ब्रिक्स संमेलनासाठी चीनचे सर्वोच्च नेते व राष्ट्राध्यक्ष शी जिन पिंग भारतात असताना चिनी लष्कर अशा प्रकारच्या कागाळ्या करत होते. चिनी सैन्य हे ठरलेल्या गस्तीच्या मार्गापासून भरकटते तेंव्हाच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर ( एल.ए.सी. ) तणावाची परिस्थिती निर्माण होत असते. यावेळी शत्रुजित कपूर यांनी चीनच्या आधुनिक शस्त्रात्राच्या तुलनेत आपल्याकडे कालबाह्य झालेली शस्त्रे आहेत, अशी कबुली दिली. मात्र सध्या आपणही मोठ्याप्रमाणात आधुनिकीकरण करत आहोत. आपल्या बटालियनमध्ये ड्रोन प्लाटून,अँटी ड्रोन सिस्टीम आणि जमिनीखाली मजबूत बंकर बांधणे, इ. कामे हाती घेतली आहेत.वारंवार घडणाऱ्या अशा घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे, पण मोदी सरकार या ज्वलंत विषयी तोंडातून ब्र काढायला तयार नाही. त्यामुळे चिनी ड्रॅगनची हिंमत वाढत चालली आहे.

