दीपक मोहिते,
माजी खा.राजन विचारे व आ. अनिल परब यांचे ठाणे पोलिसांवर सनसनाटी आरोप,
गेल्या महिन्यात ठाणे शहरात शिवसेनेचे ( उबाठा ) विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येतील सर्व आरोपीना अटक करण्यात आली.मात्र या हत्येमधील खरे सूत्रधार अद्याप मोकळे फिरत आहेत, त्यांना त्वरित अटक करा, अशी मागणी पूर्णेकर कुटुंबियांनी केली आहे.
२९ ससप्टें.२०२६ रोजी घोडबंदर रोडवरील मानपाडा येथे शिवसेना ( उबाठा ) पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची त्यांच्या कार्यालयात घुसून गोळ्या झाडल्या आणि चॉपरने वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. २९ ऑक्टो.ला हत्येला एक महिना पूर्ण झाला तरी हत्येचे नेमके कारण पोलिसांनाअद्याप स्पष्ट करता आलेले नाही. पोलिसांनी या प्रकरणात पाच आरोपींना अटक केली आहे, – सुभाष शिंदे उर्फ पप्या, निखिल यादव, नितेश पवार, संतोष कनोजिया आणि अमित सिंह. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. गुरु. ३० ऑक्टो. ला महाविकास आघाडीचे नेते आदित्य ठाकरे, अनिल परब, माजी खा.राजन विचारे, अविनाश जाधव, केदार दिघे यांनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेतली. यावेळी सहपोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष तपास पथकाच्या तपासावर नाराजी व्यक्त केली.दरम्यान
ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला. पूर्णेकर कुटुंबीयांनी त्यांच्यावर आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप केल्यानंतर त्यांची २८ ऑक्टो. रोजी विशेष तपास पथकाकडून ७ तास चौकशी करण्यात आली.
राम पूर्णेकर ( मुलगा ) आणि पत्नी यांनी न्याय
मिळत नसल्याने नौपाडा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. राम पूर्णेकर यांनी पत्रकार परिषदेत सीसीटीव्ही फुटेज दाखवले, ज्यात हेल्मेट घातलेली व्यक्ती चहाच्या टपरीवर आरोपींना भेटताना दिसते – त्यांच्या दाव्यानुसार ती व्यक्ती राजेंद्र शिंदे आहेत. कुटुंबीयांनी AI च्या मदतीने कपड्यांची तुलना केल्याचा दावा केला आहे. मात्र पोलीस म्हणतात, हा पुरावा फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठवला आहे, अद्याप तो सिद्ध झालेला नाही.
पोलीस आयुक्तांच्या दालनातच राजन विचारे यांनी संताप व्यक्त केला – “ तुम्ही आणखी मर्डर होण्याची वाट बघताय का ? पोलीस डिपार्टमेंट काय काम करतंय ? ” असा सवाल त्यांनी सहपोलीस आयुक्त उगले यांना केला.
माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्यावरील आरोप हे कुटुंबीयांनी केलेले आरोप आहेत, पोलिसांनी त्यांना अद्याप आरोपी केलेले नाही. मीनाक्षी शिंदे यांनी ” माझा या हत्येशी संबंध नाही,” असे म्हटले आहे.
पूर्णेकर कुटुंबियांनी पोलीस तपासावर आपले आक्षेप नोंदवले असून तपासात होत असलेली चालढकल व मुख्य सूत्रधारांना अटक न करणे, हे लक्षात घेता पोलीस अज्ञात शक्तीच्या दबावाखाली काम करत आहेत, असा आरोप पूर्णेकर कुटुंबियांनी केला आहे. या सर्व घडामोडीमुळे ठाणे शहरात सध्या तणावाचे वातावरण आहे. मात्र पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

