दीपक मोहिते,
महायुतीमध्ये धुसफूस सुरु; कवकरच कुस्तीचा फड रंगण्याची शक्यता…
*विधान परिषद निवडणुकीनंतर महायुतीच्या घटक पक्षात चांगलीच जुंपली आहे. शिंदे गटाचे धंगेकर विरुद्ध भाजपचे नवनाथ बन व निलेश राणे विरुद्ध बन हे तिघे एकमेकांच्या झिज्या उपटत आहेत. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून एकनाथ शिंदे यांनी धंगेकरांना सबुरीने घेण्याचे सांगितले. एकंदरीत या सर्व घडामोडीवरून महायुतीमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत असून लवकरच कुस्तीचा फड रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.*
*नुकतेच विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक पार पडली. पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर, मराठवाडा पदवीधर, पुणे शिक्षक, अमरावती शिक्षक, या निवडणुकीत महाविकास आघाडीने तिन्ही पदवीधर मतदारसंघ तर महायुतीने फक्त दोन शिक्षक मतदारसंघ जिंकले त्यानंतर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेला आरोप, हा वादाचे मूळ कारण ठरले. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गेल्या गुरुवारी पत्रकार परिषद घेत महायुतीच्या पराभवाला थेट शिवसेना शिंदे गटाला जबाबदार धरले. त्यांनी पुण्यात शिवसेनेने ऐनवेळी सचिन सानप यांना पाठिंबा दिला, त्यामुळे या निवडणुकीत सानप यांना १६ हजार मते मिळाली व भाजपच्या स्मिता जाधव यांचा १०-१२ हजार मतांनी पराभव झाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीचे ( अजित पवार ) उमेदवार सतीश चव्हाण यांच्या विरोधात प्रचार केला.” शिवसेनेने युतीधर्म पाळला असता तर ५ ही जागा जिंकलो असतो,” असे त्यांनी शिंदे गटाला सुनावले. त्यानंतर निलेश राणे यांनी नवनाथ बन याची थेट लायकी काढली. लायकीत राहायचे, अशा भाषेत राणे यानी सज्जड दम दिला. राणे यांनी X वर पोस्ट केली.” नवनाथ बन, शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं. तुझी लायकी किती आणि तू बोलतो किती,” पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले, ” तुझा जीव एवढा आणि तू बोलतो केवढा. तू कोण विचारणारा ? तू जे बोलतोय त्याला कुणाची संमती आहे ? नको त्या वाटेला जाऊ नको,” तू माझा मित्र नाही, मी २००९ ला खासदार झालो तेव्हा तू चड्डीत होतास, शाळेत होता. मी ऐऱ्यागैऱ्यांना मित्र बनवत नाही.” त्याला प्रत्युत्तर म्हणून नवनाथ बन यांनी नारायण राणे यांच्यासोबतचा जुना फोटो शेअर करून लिहिले – “Junior Navnath Ban with Senior Leader, Hon. Narayan Rane साहेब !नवनाथ बन विरुद्ध रविंद्र धंगेकर – माकडछाप वाद, दुसरीकडे नवनाथ बन यांनी रविंद्र धंगेकर यांच्यावर टीका करताना म्हटले,” बारा पक्ष फिरलेला,” माकडछाप, ” व्यक्ती भाजप आणि फडणवीसांवर खालच्या शब्दात टीका करतोय, पुणेकरांनी त्याला घरी बसवले.” त्यावर धंगेकर म्हणाले, ” बन हा पगारी प्रवक्ता,आहे, त्याचा आणि भाजपचा काय संबंध ? भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता बोलला असता तर फरक पडला असता.” हे सारे रामायण घडत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही नेत्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, ” दोस्तीत कुस्ती नको, महायुतीत वितुष्ट येईल, अशी विधाने करू नका,” भाजप प्रदेश नेतृत्वानेही बन यांना ” भाषेची मर्यादा पाळा,” असे सुनावले आहे. हा वाद फक्त विधान परिषदेपुरता नाही. आता प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरूनही निलेश राणे यांनी भाजपने शिंदेंना साथ दिली नाही,असा आरोप केला आहे. या सर्व घडामोडी लक्षात घेता महायुतीच्या घटक पक्षात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांना जाहीरपणे सबुरीचा सल्ला दिला, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी मौन पाळले आहे. कदाचित फडणवीस यांचे मौन ही वादळापूर्वीची शांतता असू शकते. कारण उद्धव व राज या दोन्ही ठाकरे बंधूनी फडणवीसाची भेट घेऊन चर्चा केली. ही भेट कशासाठी होती, यावरून मंत्रालयात कुजबुज सुरु झाली आहे. त्यामुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.*

