दीपक मोहिते,
विक्रमगडचे आ. हरिश्चंद्र भोये, ( अंतिम भाग )
आ. हरिश्चंद्र भोये ; आदिवासी समाजाचे बहूआयामी नेतृत्व,
काही महत्वाच्या कामामुळे विक्रमगडचे आ. हरिश्चंद्र भोये यांच्यावर लेख वेळेवर लिहिता आला नाही. यापूर्वी वसईच्या आ. स्नेहा दुबे पंडित, नालासोपाऱ्याचे आ. राजन नाईक, पालघरचे आ. राजेंद्र गावित, बोईसरचे आ. विलास तरे व डहाणूचे आ. कॉ. विनोद निकोले यांच्या बाबतीत आम्ही सविस्तर विवेचन केले. पण विक्रमगडचे आ.हरिश्चंद्र भोये यांच्या विषयी लेख लिहिण्यास थोडा उशीर झाला क्षमस्व,
आ. हरिश्चंद्र भोये २०२४ साली पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले.अपेक्षेनुसार त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार ) सुनील भुसारा यांचा तब्बल ४१ हजार ४०८ मतांनी पराभव केला.भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या भोये यांना या लढतीमध्ये १ लाख १४ हजार ५१४ मते मिळाली व ते निवडून आले.विक्रमगड तालुक्यातील दादाडे या गावात त्यांचा जन्म झाला. पेशानेआश्रमशाळाचे मुख्याध्यापक होते. २००४ साली पहिल्यांदा निवडणूक लढवली पण त्यांचा पराभव झाला.
या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर त्यांनी जव्हार, मोखाडा व विक्रमगडच्या आदिवासी पट्ट्यात भाजपची चांगली बांधणी केली. या काळात ते भाजप आदिवासी मोर्चा व आश्रमशाळा शिक्षक संघटनेत चांगलेच सक्रिय होते.त्यामुळे भाजपने त्यांना आदिवासी चेहरा म्हणून पुढे आणले.त्यांची एकूण संपत्ती दीड कोटी इतकी आहे.विशेष म्हणजे या लोकप्रतिनिधीवर एकही गुन्हा नाही. राजकारणातील एक समंजस, तळागाळातील लोकांसाठी कायम धडपडणारा लोकप्रतिनिधी अशी त्यांची जनमानसात ओळख आहे. जव्हार येथील कार्यालयात दररोज सकाळी उपस्थित राहून नागरिकांच्या अडचणी व समस्या ऐकणे व त्याची सोडवणूक करणे, असा त्यांचा नित्यक्रम असतो.तसेच मतदारसंघाच्या कानकोपऱ्यातील लहान खेड्याना आठवड्यातून एकदा भेट देऊन स्थानिक ग्रामस्थाशी संवाद साधणे, अशा उपक्रमामुळे ते अवघ्या वर्षभरात नावारूपाला आले. स्वच्छ प्रतिमा व संवाद साधण्याची उपजत कला, अशा गुणामुळे ते विक्रमगड तालुक्यात आदिवासी समाजाचे तारणहार म्हणून ओळखले जातात.

