दीपक मोहिते,
गुंडाच्या दहशतीमुळे सुमारे १०० कुटुंबाचे घरदार सोडून पलायन,
काल रात्री सुमारे १०० ते १५० तरुणांनी हातात तलवारी कोयते, लोखंडी सळ्या व लाठ्याकाठ्या घेऊन स्थानिक रहिवाश्याना जबर मारहाण केली. त्यामुळे या भागातील अनेक कुटंबानी आपली घरदारे सोडून पळ काढला. जेथे ही घटना घडली, त्या श्रीराम नगर येथे सध्या भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटना घडून गेल्यानंतर पेल्हार पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी हजर झाले.तोवर हे गुंड पसार झाले व जाताना आम्ही पुन्हा येऊ अशी धमकी दिली. त्यामुळे या प्रकरणी कोणी बोलायलाही तयार नाहीत.
नालासोपारा शहरात कायदा व सुव्यवस्थेचे पार धिंडवडे निघाले आहेत. दिवसाढवळ्या हत्या, बलात्कार, अपहरण, लव जिहादच्या घटना, घरफोडी,अल्पवयीन मुलींना पळवून नेणे व अमली पदार्थाची विक्री,अशा घटनांना अक्षरशः ऊत आला आहे.स्थानिक पोलीस ठाणे त्यावर नियंत्रण मिळवण्यासंदर्भात कुचकामी ठरले आहे. या परिसरात गुंडाच्या टोळ्या दिवसाढवळ्या हत्यारे घेऊन हिंडत असतात.पण पोलिसांकडून कारवाई होत नाही. लोकप्रतिनिधी देखील या प्रकरणी मूग गिळून बसले आहेत. या गुंडाच्या भितीमुळे गोरगरीब नागरिकांना आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवावे लागत आहे. नालासोपारा शहर हे राज्याच्या गुन्हेगारी क्रमवारीत प्रथम क्रमांकावर आले आहे.येथील पोलीस ठाण्यात दररोज सरासरी २० गुन्हे दाखल होत असतात. गुंडाच्या भितीने स्थानिक रहिवाश्यावर आपली घरदारे सोडण्याची पाळी पहिल्यांदाच आली आहे. कुत्र्याला मारहाण करण्यावरून दोन तरुणाध्ये हाणामारी झाली. त्यानंतर एका तरुणाने १०० ते १५० इसमांना जमा केले व त्यांनी श्रीराम नगरमधील रहिवाश्याच्या घरावर हल्ला चढवला. या घटनेत अनेक रहिवाश्याच्या घराचे दरवाजे व खिडक्यांची नासधूस झाली.या घटनेनंतर लोकांचे घरदार सोडून पलायन सुरु झाले. या परिसरात सुरु असलेली दहशत हे येथील लोकप्रतिनिधी व पोलिसांचे अपयश आहे,असे अनेक रहिवाश्यानी माध्यमाना सांगितले.

