दीपक मोहिते,
हल्लाबोल,
वाढवण बंदर ; स्थानिक ग्रामस्थाचे समुद्रात उतरून आंदोलन,
गेल्या महिन्यापासून डहाणू तालुक्यातील वाढवण व वरोर गावातील भूमिपुत्र, वाढवण बंदरा विरोधात जीवाच्या आकांताने लढत आहे. या बंदराचे काम नुकतेच सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे या गावातील शेकडो गावकऱ्यांनी समुद्रात धाव घेऊन जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन गावकऱ्यांना ताब्यात घेतले.
प्रस्तावित बंदराच्या कामाला पुन्हा सुरुवात होताच या दोन गावातील गावकऱ्याचा संताप उफाळून वर आला. शेकडो गावकऱ्यांनी समुद्राकडे धाव घेतली. त्यामध्ये महिला तरुण, तरुणी लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. समुद्रात उतरून त्यांनी मानवी साखळी केली व ” वाढवण बंदर रद्द करा, ” अशा घोषणा दिल्या. आंदोलकांनी यावेळी ” जोवर काम बंद होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील, ” अशी ताठर भूमिका घेतली.
गेल्या ३० ऑक्टो. रोजी डहाणूचे आ. कॉ. विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली वरोर येथे वीस ते पंचवीस हजार ग्रामस्थांची भव्य जनआक्रोश सभा झाली. त्यावेळी उपस्थित ग्रामस्थानी इशारा दिला होता कि गावात एकही डंपर येऊ देणार नाही.त्यानंतर दोन दिवस काम बंद होते. पण काल २ नोव्हे. रोजी पोलीस बंदोबस्तात दगड भरलेले डंपर वरोर – वाढवण समुद्राच्या दिशेने गेले व त्यानंतर तेथे भरावाचे काम सुरु झाले. त्यामुळे गावकऱ्यांचा संताप अनावर झाला व हे आंदोलन करण्यात आले. पोलिसानी घटनास्थळी येऊन काही आंदोलकांना ताब्यात घेतले व त्यांच्यावर आता गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

