सुनील अरोरा दिल्ली,
५७ मेट्रो स्थानके बंद,सर्वोच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त,
राजधानी दिल्लीमध्ये उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनापूर्वी सुरक्षा व्यवस्थेच्या मुद्द्यावरून नागरिक संताप व्यक्त करत आहेत.या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली मेट्रोच्या तब्बल ५७ स्थानकांवर प्रवेश आणि बाहेर पडण्याची सुविधा बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे लाखो प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केल्यामुळे पोलीस यंत्रणा व केंद्र सरकार अडचणीत आले आहे.
दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो स्थानके बंद ठेवण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी या परिस्थितीविषयी चिंता व्यक्त करताना, आंदोलनाचे आयोजक प्रत्यक्षात उपस्थित नसतानाही मेट्रो स्थानकांवर निर्बंध का लागू ठेवण्यात येत आहेत, असा प्रश्न उपस्थित केला आहे. दिल्ली आणि आसपासच्या परिसरातून दररोज लाखो नागरिक नोकरी, व्यवसाय आणि इतर कामांसाठी मेट्रोने प्रवास करतात. अशा परिस्थितीत स्थानके बंद ठेवल्यास त्यांच्या दैनंदिन जीवनावर आणि रोजीरोटीवर परिणाम होऊ शकतो, याकडे न्यायालयाने लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे, गुरुग्राम, पूर्व दिल्ली, दक्षिण दिल्ली आणि राजधानीतील इतर भागांतून मोठ्या संख्येने प्रवासी दररोज मेट्रो सेवेचा वापर करत असतात. मेट्रो ही अनेकांसाठी केवळ प्रवासाची सुविधा नसून कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचण्याचं महत्त्वाचं साधन आहे. त्यामुळे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची काळजी घेताना सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होणार नाही, याचाही विचार केला पाहिजे, अशी भूमिका सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणातून समोर आली आहे.
या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मेट्रो सेवा पूर्णपणे बंद ठेवण्याऐवजी गाड्यांच्या फेऱ्या कमी करण्याचा पर्याय सुचवला. सॉलिसिटर जनरल यांना यासंदर्भात सूचना करताना, सुरक्षेची व्यवस्था राखण्यासोबत प्रवाशांना शक्य तितकी सेवा उपलब्ध राहावी, याविषयी न्यायालयाने काही महत्वाच्या सूचना केल्या. त्यामुळे आता मेट्रो सेवा बंद ठेवण्याच्या निर्णयाबाबत प्रशासन काय भूमिका घेते याकडे दिल्लीकरांचे लक्ष लागलं आहे. दरम्यान, दिल्ली मेट्रो प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आज रात्री ९.०० वाजल्यापासून ५७ मेट्रो स्थानकांवर प्रवाशांना प्रवेश आणि बाहेर पडण्याची सुविधा बंद ठेवण्यात येणार आहे. हे निर्बंध १० ऑक्टो.रोजीही पुढील आदेश मिळेपर्यंत लागू राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र, काही स्थानकांवर इंटरचेंजची सुविधा सुरू ठेवण्यात येणार आहे. ज्या स्थानकांच्या नावापुढे तारांकित चिन्ह आहे, त्या स्थानकांवर एका मेट्रो मार्गावरून दुसऱ्या मार्गावर जाण्याची सुविधा उपलब्ध असेल. मात्र, नवी दिल्ली मेट्रो स्थानकावर इंटरचेंजची सुविधाही बंद राहणार आहे. या निर्णयामुळे दिल्लीतील मेट्रो प्रवाशांना पर्यायी मार्गांचा विचार करावा लागणार आहे.
कार्यालयीन कामासाठी, व्यवसायासाठी किंवा इतर महत्त्वाच्या कारणांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना अधिक वेळ लागू शकतो. त्यामुळे प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी आपल्या मार्गाची आणि संबंधित मेट्रो स्थानकाच्या स्थितीची अधिकृत माहिती तपासून घ्यावी, तसेच गरज पडल्यास पर्यायी वाहतुकीचा वापर करावा, असं आवाहन करण्यात येत आहे. एकीकडे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा ठरत आहे, तर दुसरीकडे मेट्रो स्थानकं बंद ठेवल्यामुळे सामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे आता सुरक्षेची गरज आणि प्रवाशांची सोय यांचा समतोल कसा साधला जाणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. १० ऑक्टो. रोजी दिल्लीतील परिस्थिती कशी राहते आणि मेट्रो निर्बंधांबाबत प्रशासनाकडून काही बदल केले जातात का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

