सुनील अरोरा : दिल्ली,
प्रियंका व राहुल गांधी राजघाटावर दाखल,आंदोलन अधिक तीव्र होणार,
भाजप व इंडिया आघाडी यांच्यात मुख्य निवडणूक आयुक्त यांनी राजीनामा द्यावा यासाठी सध्या धमासन सुरु आहे.निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. आज काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीच्या नेत्यांनी दिल्लीतील राजघाटावर आज सामूहिक प्रार्थना केली.
निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील इंडिया आघाडीच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. गुरुवारी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीच्या नेत्यांनी दिल्लीतील राजघाटावर मोर्चा काढला. या आंदोलनात काँग्रेससह विविध विरोधी पक्षांचे सर्व खासदार सहभागी झाले होते.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज इंडिया आघाडीच्या खासदारांसाठी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथे भोजनाचे आयोजन केले होते.या बैठकीला राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह समाजवादी पक्ष, शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि डाव्या पक्षांचे नेते उपस्थित होते. त्यानंतर सर्व नेते राजघाटावर दाखल झाले आहेत.या आंदोलनामध्ये विशेष मतदारयादी पुनरावलोकन म्हणजेच एसआयआर कथित ” व्होट चोरी,” आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मुद्द्यांवर विरोधकांनी हे आंदोलन चालवले आहे. इंडिया आघाडीच्या सर्वपक्षीय नेत्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीमध्ये या आंदोलनाला चांगलाच वेग आला आहे. मंगळवारी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर काल जंतरमंतरकडे मोर्चा काढताना राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह काही नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.या कारवाईवरून काँग्रेस आणि दिल्ली पोलिसांमध्ये झटापटी झाल्या.आज आंदोलनाचा मार्ग राजघाटाच्या दिशेने वळवण्यात आला. महात्मा गांधींच्या स्मारकाजवळ शांततापूर्ण धरणं आंदोलन करण्याची भूमिका इंडिया आघाडीने घेतली आहे.जवळपास ३०० खासदार राजघाटकडे रवाना होत आहेत.
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मध्य दिल्ली आणि निवडणूक आयोगाच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. गेल्या दोन दिवसांत घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. दुसरीकडे, निवडणूक आयोग आणि भाजप या दोघानी मतदार यादीतील फेरफाराचे आरोप फेटाळले आहेत. त्यामुळे एसआयआर मतदारयादी आणि निवडणूक प्रक्रियेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. सलग तिसऱ्या दिवशी सुरू असलेल्या या आंदोलनामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापलं असून, इंडिया आघाडीच्या पुढील भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार हे राजीनामा देत नाहीत, तोवर हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे माध्यमाना सांगितले.

