दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
कथित ५०० कोटीचे प्रकरण ; शिंदे गट सध्या पिछेहाटीवर…
जरांगे पाटील यांच्या कथित ५०० कोटीच्या आरोपानंतर महायुतीमधील भाजप व शिवसेना ( शिंदे गट ) या दोघांमध्ये सध्या चांगलीच जुंपली आहे. काल दिवसभर भाजपचे शिलेदार आक्रमक भूमिकेत होते. हा वाद लवकर मिटेल,असे असे वाटत नाही. त्यामुळे शिंदे गटाने आपल्या शिलेदारांना याप्रकरणी कोणीही प्रतिक्रिया देऊ नये, असे फर्मावले आहे.गेल्या दोन दिवसात भाजप – शिवसेना ( शिंदे गट ) यांनी एकमेकांवर वार – पलटवार केल्यामुळे वाद चर्चेत राहीला. हा वाद असाच सुरु राहिल्यास आपली बदनामी होते, असे जाणवल्यानंतर पक्षाने यावर कोणीही बोलू नये, असा आदेश दिल्याचे सांगण्यात येत आहे.
५०० कोटी रु.चा आरोप झाल्यानंतर जरांगे यांनी एक ऑडियो क्लिप व्हायरल केली व वादाला तोंड फुटले. ५०० कोटी रु. कोणाला दिले ? याचा खुलासा शिंदे यांनी करावा, असा प्रश्न उपस्थित करत, त्यांनी ती ऑडिओ क्लिप माध्यमाच्या प्रतिनिधीना ऐकवली व राजकीय क्षेत्रात गदारोळ उठला. त्यानंतर अवघ्या काही तासात भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन, प्रवीण दरेकर व प्रसाद लाड, यांनी पलटवार करण्यास सुरुवात केली. दुसरीकडे शिंदे गटाचे रामदास कदम यांनी जरांगे यांच्यावर अर्वाच्च भाषेत टीका केली. त्यामुळे संतप्त झालेल्या जरांगे यांनीही त्यांना जशास तसे उत्तर देण्यास सुरुवात केली. याप्रकरणी त्रिकोणी वादाला ( शिंदे गट, भाजप व जरांगे ) सुरुवात झाली. या वादात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे या दोघांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर याविषयी पक्षातील कोणीही प्रतिक्रिया देऊ नये, असा फतवा जारी करण्यात आला. शिंदे गटाने आपल्या तलवारी केल्यामुळे एकमेकांवर ( भाजप व शिंदे गट ) टीका करण्याचे सत्र आता थांबले आहे. जरांगे यांना ही ऑडियो क्लिप कशी मिळाली ? व त्याची सत्यता किती ? याचा तपास करण्यात येत आहे. या तपासातून काही निष्पन्न होण्याची शक्यता फार कमी आहे. शिंदे गट, हा ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर याच्या हत्येनंतर अडचणीत आला असताना एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्यासाठी महायुतीमधील अज्ञात शक्ती सक्रिय झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या लढाईत शिंदे गटाची चांगलीच पीछेहाट झाली आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे यांना आगामी काळात ताकही फुंकून प्यावे लागणार आहे.

