दीपक मोहिते,
” हल्लाबोल, ”
राष्ट्रवादी काँग्रेसला ( अजित पवार ) फुटीचे ग्रहण लागण्याची शक्यता,
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ( अजित पवार गट ) सुरु असलेले शीतयुद्ध काही थांबायचे नाव घेत नाही. काल पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यानी केलेल्या एका वक्तव्यामुळे आगीत तेल ओतले गेले आहे. यापूर्वी सुनील तटकरे यांनी पक्षांच्या ज्येष्ठ नेत्या व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केल्यामुळे पक्षात वातावरण तापले होते. अशावेळी प्रफुल्ल पटेल यांनी टायमिंग साधत पुणे शिक्षक मतदारसंघाची आपल्या पक्षाला मिळाली असती तर चांगल झालं असते. असे स्पष्ट करत सुनेत्रा पवार यांना लक्ष्य केले. या सर्व धडामोडी लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेला सत्तासंघर्ष टिपेला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या सुरु असलेला सत्तासंघर्ष सध्या सुप्तावस्थेत असला तरी तो कधीही जाहीरपणे उफाळून वर येऊ शकतो.
अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी अत्यंत घाईगडबडीत पक्षाची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्यांच्या या कृतीमुळे पक्षात मिठाचा खडा पडला. अजित पवार यांचे खंदे समर्थक अशी ओळख असलेले सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल हे दोघेhi नाराज झाले व त्यांनी वेळोवेळी सुनेत्रा पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करण्यास सुरुवात केली. त्यांनतर पक्षात शह – कटशहाचे राजकारण सुरु झाले. सुनेत्रा पवार व पार्थ पवार या दोघा मायलेकांनी तटकरे व पटेल यांचे पंख कापण्यास सुरुवात केली. दरम्यान गेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान सुनील तटकरे यांनी आपला कट्टर शत्रू असलेल्या शिवसेनेशी ( शिंदे गट ) एक तडजोड केली. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांनी शिंदे गटाला देऊ केले व त्या बदल्यात आपल्या मुलासाठी विधानपरिषदेची उमेदवारी पदरात पाडून घेतली. एकाच कुटुंबात तीन पदे देण्यात आल्यामुळे पक्षातून मोठ्याप्रमाणात नाराजी व्यक्त झाली होती. त्यावर सुनेत्रा पवार यांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण त्यानंतर या दोघांनी पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपला गेल्यामुळे पक्षाच्या धुरीणावर अप्रत्यक्ष टीका केली. त्याचे पक्षात जोरदार पडसाद उमटू लागले. पक्षाच्या नेत्या ऍड. रुपाली ठोंबरे पाटील यांनी काल माध्यमाशी बोलतांना सुनील तटकरे यांच्यावर चांगलेच तोंडसूख घेतले. पुण्याची जागा भाजपला जाण्या प्रकरणी ” तुम्ही सर्वस्वी जबाबदार असल्याचे सांगत तटकरे यांना लक्ष्य केले. एकंदरीत या सर्व घडामोडी लक्षात घेता आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसला ( अजित पवार ) फुटीचे ग्रहण लागण्याची दाट शक्यता आहे.

