दीपक मोहिते,
कैसा हराया….?
ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. ३० मधून एमआयएमच्या तिकिटावर निवडून आलेली आणि आपल्या आक्रमक भाषणांमुळे राज्यभरात चर्चेत आलेली नगरसेविका सहर शेख हीचे वडील युनुस शेख यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. युनुस शेख यांना पक्षात प्रवेश देताच त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीचे ठाणे आणि कळवा-मुंब्र्याच्या राजकीय वर्तुळात पडसाद उमटत आहेत. शिवसेनेतील ( शिंदे गट ) अनेक नेत्यांचा शेख यांच्या पक्षप्रवेशाला विरोध होत आहे. तर भाजपचे नितेश राणे यांनी शिवसेनेने या निर्णयाचा फेरविचार करावा, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीरपणे सुचवले आहे.
युनुस शेख यांच्या पक्षप्रवेशाचे छायाचित्र समोर आले असून, यामध्ये शिंदे सेनेचे पदाधिकारी त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र देताना पाहायला मिळाले. युनुस शेख यांची शिंदे सेनेच्या कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्राच्या केबल सेना अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती स्वतः पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने करण्यात आल्याचा स्पष्ट उल्लेख या नियुक्तीपत्रात करण्यात आला आहे.
ठाणे महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर सहर शेख यांचे एक भाषण प्रचंड व्हायरल झाले होते. सहर शेखने भरसभेत विरोधकांना डिवचताना ” कैसा हराया sssss…” असा नारा दिला होता. तसेच येणाऱ्या काळात संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगाने व्यापून टाकायचा आहे, असा दावा तिने केला होता.
युनुस शेख हे एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे अत्यंत निकटवर्तीय होते.मात्र नंतर त्यांच्यात मतभेद निर्माण झाले. ठाणे पालिका निवडणुकीत युनुस शेख यांनी मुलीसाठी शरद पवार गटाकडून उमेदवारी मागितली होती. मात्र आव्हाडांनी उमेदवारी नाकारल्यामुळे सहर शेखने थेट एमआयएममध्ये प्रवेश करून निवडणूक जिंकली.
निवडून आल्यानंतर विजयी सभेत बोलताना युनुस शेख यांनी आव्हाडांवर जोरदार टीका केली. “अल्लाहने माझ्या मुलीला ‘ हिजाबवाली बेटी,’ म्हणून प्रसिद्ध केले. आव्हाडांनी यापुढे मुलींच्या भविष्याशी खेळू नये, नाहीतर आमचा समाज कशी विकेट पाडतो हे पाहिलेच आहे. आता प्रभाग ३० मध्ये फिरताना दिसलास तर तुला दाखवतो,” असा थेट इशारा युनुस शेख यांनी दिला होता.
युनुस शेख यांनी थेट शिंदे सेनेचा झेंडा हाती घेतल्यामुळे कळवा-मुंब्रा पट्ट्यात जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.जितेंद्र आव्हाडांना शह देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी ही खेळी केल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

