दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुरघोडीच्या राजकारणाला वेग,
अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी धुसफुस सुरु झाली, ती अद्याप थांबलेली नाही. पक्षातील एक गट पार्थ पवार यांच्याकडून होत असलेल्या हस्तक्षेपावर प्रचंड नाराज आहे.या सर्व घडामोडीवर तटकरेंनी अद्याप थेट प्रतिक्रिया दिलेली नाही.अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ( अजित पवार गट) नेतृत्व, अर्थखाते आणि विलीनीकरण यावरून अंतर्गत धुसफूस सुरू आहे.
अजित पवारांकडे असलेले अर्थखाते त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले. ते खाते पुन्हा राष्ट्रवादीला देण्यात यावे, अशी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मागणी आहे.
शिंदे गटाचे कर्जतचे आ.महेंद्र थोरवे यांनी ७ नोव्हें.रोजी खळबळजनक दावा केला आहे कि अजित पवारांच्या निधनानंतर तटकरेंनी सर्व आमदारांना फोन करून त्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना स्वतःला उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थखाते हवे होते, आणि पक्षावरही ताबा मिळवायचा होता. पण सुनेत्रा पवार यांनी तिसऱ्याच दिवशी शपथ घेऊन तो डाव उलटवला, असा थोरवे यांनी दावा केला आहे. थोरवे यांनी तटकरेंना ” खोटे आणि कपटी माणूस ” असेही म्हटले आहे.*
*तत्पूर्वी ६ नोव्हें.रोजी तटकरे यांनी स्वतःच म्हटले होते कि ” अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस १२ फेब्रु.ला एकत्र आल्या असत्या. विलीनीकरणाची चर्चा झाली होती, दादांनी त्याची मला कल्पना दिली होती.” या विधानानंतर वाद वाढला, कारण याआधी तटकरे विलीनीकरणाबाबत अनभिज्ञ असल्याचे सांगत होते. आता त्यांनी यू-टर्न घेतला, असा आरोप थोरवे आणि इतरांनी केला. अजित पवार हयात असताना विलीनीकरणाबाबत १३ बैठका झाल्या होत्या, मग विश्वासू सहकारी असलेले तटकरे त्या बैठकांना का नव्हते ? असा सवालही थोरवे यांनी विचारला आहे.
पार्थ पवार यांच्या वाढत्या हस्तक्षेपावरून वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी आहे, असे टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटले आहे. काही नियुक्त्या पार्थ यांनी वरिष्ठांना न विचारता केल्या, असा आरोप आहे.. छगन भुजबळ यांनी तर आपल्याला नियुक्त्या माध्यमातून कळल्याचे जाहीरपणे सांगितले होते. सुनेत्रा पवार यांना न सांगता प्रफुल्ल पटेल, तटकरे, भुजबळ, मुश्रीफ, वळसे पाटील, धनंजय मुंडे यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यात अर्थखाते परत मिळावे आणि विलीनीकरणाचा मुद्दाही होता, असे सांगण्यात येते. तटकरेंनी नंतर म्हटले आहे की, सध्या विलीनीकरणाची कोणतीही चर्चा नाही, विषय संपला आहे. राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीनेही विलीनीकरणाला नकार दिला आहे.पण पक्षात दोन गट पडल्याची चर्चा थांबलेली नाही. तटकरे असंतुष्ट आमदारांचे नेतृत्व करत आहेत, हे थेट पुराव्यासह समोर आलेले नाही. पण अर्थमंत्रीपद / उपमुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी आमदारांना फोन केले, हा आरोप शिंदे गटाच्या आमदाराने केला आहे,आणि त्यामुळे राष्ट्रवादीत कुरघोडीचे राजकारण सध्या चांगलेच पेटले आहे.

