दीपक मोहिते,
राज्यात १९ जिल्ह्यातील ८३ तालुके दुष्काळग्रस्त,
राज्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे राज्याच्या १९ जिल्ह्यातील ८३ तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या महिन्यात या सर्व जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी सरकारने ऑक्टो. च्या पहिल्या आठवड्यात अधिकृतपणे दुष्काळ जाहीर करण्याची तयारी चालवली आहे.
पुणे वेधशाळेने जाहीर केलेल्या माहितीनुसार मराठवाडा व विदर्भ विभागात ३० % पेक्षा अधिक पावसाची तूट आहे. अति गंभीर जिल्हे – ( ४० % पेक्षा अधिक तूट ) सोलापूर – ५७ % तूट, बीड – ५२ %, हिंगोली – ४९ %, जालना – ४६ %, धाराशिव – ४६ %, अहिल्यानगर – ४२ % व परभणी – ४२ %, नंदुरबार – ४६.६ %,
गंभीर जिल्हे – ( २५ ते ४० % तूट ) लातूर – ३७ %, नांदेड – ३२ %, छ. संभाजीनगर, कोल्हापूर, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, सातारा व सांगली,
मराठवाड्यात यंदा फक्त ५०३ मि.मी.पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप पीक केवळ ५० % हाती लागण्याची शक्यता आहे.
यावर उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रीय दुष्काळ निवारण संघटनेच्या निकषानुसार त्वरित पंचनामे करून मदत जाहीर करणे, चारा छावण्या व टँकरने पाणीपुरवठा सुरु करणे, पीककर्ज माफी व पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन,
हलक्या जमिनीवरील सोयाबीन, मूग, उडीद इ. पिके पाण्याअभावी जळाली आहेत, तेथे हरभरा व ज्वारी सारखी रब्बी पीके घेणे. अशा उपाययोजना करण्यात येणार आहेत. एकीकडे अशी परीस्थिती निर्माण झाली असताना यंदा पालघर जिल्ह्यात मात्र सरासरीपेक्षा १० % अधिक पाऊस झाला आहे. सप्टेंबर अखेर १२७ % पाऊस झाला असून गेल्या वर्षाच्या तुलनेत १५ ते १७ % टक्के अधिक आहे. जिल्ह्यातील सर्व धरणे १०० % भरली आहेत. कर्नाटक राज्यात सरकारने १२४ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे.तसेच त्या राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्याना विविध सवलती लागू करण्यात येणार आहेत.

