दीपक मोहिते,
” हल्लाबोल, ”
५ हजार रु.त दिवाळी साजरी करून दाखवा… दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे देवाभाऊच्या सरकारला आव्हान,
” देवाभाऊच्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? ” असा सवाल सध्या ग्रामीण भागातील दुष्काळग्रस्त शेतकरी विचारत आहेत. या सरकारने दिवाळीपूर्वी प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात ५ हजार रु. जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम तात्पुरती मदत म्हणून देत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. केंद्र सरकारची पूर्ण मदत व पंचनाम्यासाठी वेळ लागणार असल्यामुळे हा तात्पुरता निर्णय घेण्यात आल्याचे सरकारतर्फे सांगण्यात येत आहे.
दुष्काळी तालुक्यातील सुमारे सव्वा कोटी शेतकऱ्यांसाठी ६ हजार कोटी रु. लागणार आहेत. तसेच पंचनाम्याची कामे देखील धिम्यागतीने होत असल्यामुळे सरकारकडून तातडीने हे पैसे देण्यात येत आहेत. मात्र सरकारच्या या कृतीचे शेतकरी सर्वत्र निषेध करत आहेत. धाराशिव जिल्ह्यातील सुरडी गावचे शेतकरी चांद शेख यांनी यांनी, आपल्याला मिळलेली ५ हजाराची रक्कम त्यांनी मनीऑर्डर करून देवाभाऊंना परत पाठवली आहे.त्यांनी दीड एकर सोयाबीनवर २५ हजार रु. खर्च केले. पण केवळ ६० किलोचे उत्पन्न हाती आले. सरकारने त्यांच्या खात्यात केवळ ३ हजार ९०० रु. जमा केले. त्यामुळे संतापलेल्या चांद शेख यांनी आपल्या मित्राकडून १,१०० रु. उसने घेतले व सरकारला ५ हजार रु. ची मनीऑर्डर पाठवून दिली. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की एका हेक्टर साठी बियाणे, खत औषधे व मजुरी मिळून किमान १ लाख रु. खर्च येतो. त्यामुळे सरकारने आम्हा शेतकऱ्यांना ५ हजार रु. देऊन आमची क्रूर चेष्टा चालवली आहे. सरकारचे हे वर्तन आम्हा पिडीत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे.

