दीपक मोहिते,
पालघर जिल्ह्यात ८ हजार ३२० पात्र शेतकऱ्यांना ४७.३७ कोटींचा लाभ,
नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून दिलासा देण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पालघर जिल्ह्यातील लाभार्थ्यांची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. आतापर्यंत चार याद्यांमधून एकूण ८ हजार ३२० पात्र शेतकऱ्यांना सुमारे ४७ कोटी ३७ लाख रु.चा निधी वितरित करण्यात आला आहे.
राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी ३० सप्टें. २०२५ रोजी पीक कर्ज थकीत असलेल्या आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत कर्जाची परतफेड न करू शकलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रु.पर्यंत कर्जमाफी देण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. तसेच कर्ज घेऊन नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ५० हजार रु.पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.
पालघर जिल्ह्यात यापूर्वी १० हजार ४४४ शेतकऱ्यांची पहिली यादी, ४७९ पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी आणि २०६ पात्र शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर २२ ऑक्टोबर २०२६ रोजी १ हजार १९१ पात्र शेतकऱ्यांची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे.
चारही याद्यांमध्ये एकूण १२ हजार ३५१ पात्र शेतकऱ्यांचा समावेश आहे. यापैकी आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना लाभ वितरित करण्यात आला आहे. पहिल्या यादीतील ५ हजार ६१६ शेतकऱ्यांना २९ कोटी २० लाख ४३ हजार रु., दुसऱ्या यादीतील २ हजार ६१५ शेतकऱ्यांना १४ कोटी ८१ लाख ७९ हजार २२९ रु., तर तिसऱ्या यादीतील ५२६ शेतकऱ्यांना ३ कोटी ३५ लाख रु. वितरित करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात प्रसिद्ध झालेल्या चार याद्यांमधील १२ हजार ३५१ पात्र शेतकऱ्यांपैकी १० हजार ०२८ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे, तर ३ हजार ३२३ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण प्रलंबित आहे. संबंधित शेतकऱ्यांनी तातडीने आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे. त्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखा किंवा संबंधित बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक किशन रत्नाळे यांनी केले आहे.

