दीपक मोहिते,
वर्गात सर्वात सुंदर शिक्षक असतो,
शिक्षक गौरव दिन आणि गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळा विरार पश्चिमेस उमराळे गावात नुकताच पार पडला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना गोम्स आळी चर्चचे प्रमुख धर्मगुरू रे. फा. फिलिप गोन्सालविस म्हणाले, वर्गात सर्वांत सुंदर शिक्षक असतो. शिक्षक घडवतो लेखक, कवी, संशोधक, शास्रज्ञ, डाँक्टर, वकील, तत्त्वज्ञ, गायक, समाजसुधारक.आपण जे घडवता ते लक्षवेधी शिल्प आहे.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमराळे चर्चचे प्रमुख धर्मगुरू रे. फा. नितीन डिसोजा होते. ते आपल्या भाषणात म्हणाले, शिक्षक प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळ्या प्रसंगी,वेगवेगळे प्रभाव निर्माण करत असतो. शिक्षकांचे एखादे वाक्य वा त्यांनी दिलेली पाठीवरील शाबासकीची थाप विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत असते.
याप्रसंगी दहा सेवानिवृत्त शिक्षक आणि वयाची ७५ पूर्ण केलेले शिक्षक गुणवंत शिक्षक आणि गुणवंत विद्यार्थी यांचा सन्मान करण्यात आला.
विशेष अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते विल्यम गोन्सालविस यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रसिद्ध गायक संजीव गोन्सालविस या़नी म्हंटलेल्या
” गगन सदन तेजोमय,” या प्रार्थनागीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांची ओळख रेखा डिब्रिटो आणि एव्हरीना गोन्सालविस यांनी करुन दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लीना डिकुन्हा यांनी केले. प्रास्ताविक ज्ञानज्योत संघटनेचे अध्यक्ष बाँनी पेगाडो यांनी केले. तर थाँमस लोपीस यांनी उपस्थितांचे आभार मानले.

