दीपक मोहिते,
” घडलंय बिघडलंय,
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा ; सोहळे मोठे व लक्षण खोटे,
मराठी भाषेला इतर भाषेप्रमाणे अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी गेली अनेक वर्षे राज्यातील विविध सामाजिक संस्था तसेच राज्य सरकार जोरदार प्रयत्न करत होते. पण केंद्र सरकार तो दर्जा देण्यासंदर्भात सतत चालढकल करत होते. अखेर तीन ऑक्टो. २०२४ रोजी केंद्र सरकारने हा दर्जा देण्यास हिरवा कंदील दाखवला. नुकताच ३ ऑक्टो. २०२६ रोजी पहिला मराठी अभिजात भाषा दिवस आणि अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा झाला. या सप्ताहाचे उदघाट्न राज्याचे मुख्यमंत्री यांनी केले.
या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षात भाषेला प्रत्यक्षात किती फायदा झाला ? याविषयी आढावा घेणे, क्रमप्राप्त ठरते. पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये ” सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर क्लासिकल मराठी,” ला केंद्राने मंजुरी दिली. या विषयी डीपीआर ( डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट ) केंद्र सरकारकडे पाठवला आहे. डेक्कन कॉलेज हे देशभरात मराठी भाषेचे मुख्य संशोधन केंद्र असेल. हे केंद्र सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ क्लासिकल तामिळ सारखेच असेल.
अभिजात दर्जा मिळाल्यानंतर केंद्राकडून कोट्यवधीचा निधी मिळतो. त्याचा वापर खाली नमूद करण्यात आलेल्या तीन कामासाठी करण्यात येतो.
१ ) प्राचीन ग्रंथाचे जतन, डिजिटायझेशन, भाषांतर,
२ ) देशभरातील केंद्रीय विद्यापीठामध्ये मराठीचे अध्यासन स्थापन करणे,
३ ) दरवर्षी २ आंतरराष्ट्रीय पुरस्कार – अभिजात भाषेच्या विद्वानासाठी,
या निर्णयामुळे आकारायव्हिंग, अनुवाद, प्रकाशन, डिजिटल मिडियामध्ये रोजगार निर्मिती होणार, असा सरकारकडून दावा करण्यात येत आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे जगभरात मराठीची सर्वाधिक साहित्य संमेलने आयोजित करण्यात येत आहेत आणि हा मुद्दा केंद्र सरकारनेही मान्य केला आहे. ८३ दशलक्ष लोक बोलणारी भाषा म्हणून तीची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण झाली आहे. एक हजारहून अधिक वर्षाचा संत साहित्याचा वारसा आता अधिकृतपणे ” क्लासिकल,” म्हणून नोंदवला गेला आहे.
अभिजात दर्जा मिळाल्यानंतरही अनेक प्रश्न आजही ” जैसे थे,” स्थितीतच आहेत.
शाळा व कॉलेजेसमध्ये अद्याप मराठीची सक्ती नाही, सरकारी कामकाजात १०० % मराठी भाषेचा वापर नाही, नोकऱ्यांमध्ये मराठीला प्राधान्य नाही,
दोन वर्षात अंमलबजावणी अपेक्षित होती, पण फारसे काही झाले नाही.अद्याप केंद्र सरकारकडून निधीही उपलब्ध झाला नाही.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी आपण जीवाचे रान केले पण पदरात काय पडले तर शून्य…

