दीपक मोहिते,
पालघर जिल्हा परिषदेत शिक्षक भरती प्रक्रिया वेगात सुरु,
जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त शिक्षक पदे भरण्याच्या प्रक्रियेला आता प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.पवित्र प्रणालीअंतर्गत प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या यादीतील पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी काल २ सप्टें.पासून सुरू झाली आहे. ही पडताळणी उद्यापर्यंत जिल्हा परिषद पालघर कार्यालयात सुरु राहणार आहे.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५च्या आधारे पद निवडीचा विकल्प दिलेल्या संस्थांमध्ये ही शिक्षक पदभरती करण्यात येत आहे. जिल्हा परिषद पालघरसाठी पवित्र प्रणालीअंतर्गत मराठी व उर्दू माध्यमातील उमेदवारांची यादी उपलब्ध झाली आहे.
मराठी माध्यमातील पदनिहाय आकडेवारीनुसार २ री ते ५ वी – ३२८ पदांसाठी ३४७ उमेदवार, ६ वी ते ८ वी – विज्ञान विषयासाठी ४०० पदे व ३१७ उमेदवार, ६ वी ते ८ वी भाषा ( मराठी ) विषयासाठी १५ पदे व २०३ उमेदवार, तर ६ वी ते ८ वी समाजशास्त्र विषयासाठी १६ पदे व १६ उमेदवार उपलब्ध झाले आहेत.
उर्दू माध्यमासाठी २ री ते ५ वी – २२ पदांसाठी ५ उमेदवार, ६ वी ते ८ वी – विज्ञान विषयासाठी ११ पदे व १० उमेदवार, तर इयत्ता ६ वी ते ८ वी भाषा (उर्दू) विषयासाठी २ पदे – १ उमेदवार उपलब्ध झाला आहे.
प्राप्त यादीनुसार पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी २ ते ४ सप्टे. २०२६ या कालावधीत जिल्हा परिषद पालघर कार्यालयात करण्यात येत आहे. उमेदवारांनी जिल्हा परिषद संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार आवश्यक कागदपत्रांसह निर्धारित वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.
रिक्त शिक्षक पदांची भरती पूर्ण झाल्यानंतर जिल्हा परिषद शाळांमधील अध्यापन व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून, विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही प्रक्रिया महत्वाची ठरणार आहे.

