*दीपक मोहिते,*
पालघर हॉस्पिटल मारहाण प्रकरण ; २१ आरोपीना पोलीस कोठडी,
*दहीहंडी उत्सवानंतर पालघर येथील एका खाजगी रुग्णालयात डॉक्टरांशी गैरवर्तन करणे, रुग्णालय कर्मचाऱ्याला मारहाण करणे तसेच अतिदक्षता विभागात शिरल्या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणी संशियत असणाऱ्या १० आरोपींपैकी शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांच्यासह आठ ज्ञात व एक अन्य संशयित आरोपी रवि. सकाळी पालघर पोलीस स्टेशनमध्ये शरण आले.*
*या प्रकरणातील २३ पैकी २२ आरोपींना न्यायालयाने १६ सप्टें.पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.* *पालघर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ( रिमांड कोर्ट क्र. ४ ) योगेश एच. गजभिये यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला आहे.*
*पालघर मधील रिलीफ हॉस्पिटलमध्ये शिवसैनिकांनी धुडगूस घातल्या प्रकरणात दहा ज्ञात व सात ते आठ अज्ञात तरुणा विरुद्ध पालघर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात राहुल घरत यांना ७ सप्टें. रोजी तर आमदार पुत्र रोहित गावित यांना ११ सप्टें. रोजी अटक करण्यात आली. तसेच या शिवसैनिका सोबत असणाऱ्या गोविंदा पथकातील बारा इसमांना अटक करण्यात आली होती. रोहित गावित याला १६ सप्टें. पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली, तर राहुल घरत व गोविंदा पथकातील १२ इसमांची पोलीस कोठडी दोन दिवसापूर्वी संपली होती. दरम्यान शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख कुंदन संखे व अन्य सात संशयित आरोपींनी गेल्या सोम.पासून पालघर बाहेर पलायन केले होते. पोलिसांकडून त्यांना पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू असताना पक्षातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार ही मंडळी रवि.सकाळी आठच्या सुमारास पालघर पोलीस स्टेशनमध्ये शरण आली. त्यानंतर रुग्णालयाच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झालेल्या एका अन्य संशयित आरोपीचा चालकाने दुपारी पालघर पोलिसांकडे स्वतःला स्वाधिन केले. अशाप्रकारे या प्रकरणातील २२ संशयित आरोपी यांची सुनावणी पालघरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर दुपारी तीन ते चार दरम्यान करण्याबाबत न्यायालयाला माहिती देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात आरोपींना* *सायंकाळी पावणे सातच्या सुमारास हजर करण्यात आल्यानंतर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात रात्री ९.०० वाजेपर्यंत सुनावणी सुरू होती. पालघर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात ( गु.र.क्र. २९३/२०२६, ) भारतीय न्याय संहिता आणि ‘महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था ( हिंसाचार व मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक ) अधिनियम,*) २०१०’ *अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याशिवाय तपासा दरम्यान* *बीएनएसच्या कलम ४९,१२५, १९१ ( २ ) आणि ३३३ या वाढीव कलमांचाही समावेश करण्यात आला.डहाणूचे*
*उपविभागीय पोलीस अधिकारी निशा जाधव यांनी आरोपींना न्यायालयात हजर केले.सुनावणी दरम्यान आरोपींच्या आवाजाचे नमुने घेणे बाकी आहे. आरोपींचे मोबाईल फोन अद्याप जप्त करायचे असून घटनेचे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज बंगळुरू येथील क्लाऊड सर्व्हरकडून मागवण्यात आले आहे. गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी ५ दिवसांची पोलीस कोठडी आवश्यक आहे, असे सरकारी अभियोक्ता व तपास अधिकाऱ्यांनी युक्तिवाद करताना स्पष्ट केले. दुसऱ्या बाजूने आरोपींच्या वकिलांनी पोलीस कोठडीला विरोध केला. “ आरोपी हे गोविंदा पथकाचे सदस्य असून केवळ जखमी मित्राला भेटण्यासाठी रुग्णालयात गेले होते. तेथे कोणताही बेकायदेशीर जमाव नव्हता तसेच प्रसारमाध्यमांच्या दबावाखाली पोलीस कोठडीची मागणी करत आहेत,” असा दावा करत आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती वकिलांनी केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, केस डायरी आणि प्रथम खबरी अहवाल तपासल्यानंतर न्यायालयाने स्पष्ट केले की, गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असून आरोपींचा प्रथमदर्शनी सहभाग स्पष्ट दिसत आहे. घटनेचा पुढील तपास आणि तांत्रिक पुरावे गोळा करण्यासाठी आरोपींची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे स्पष्ट केले व न्यायालयाने पोलिसांची मागणी अंशतः मान्य केली आणि २२ आरोपींची १६ सप्टें.२०२६ पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली.*
पालघर येथील रिलीफ *हॉस्पिटलमधील तोडफोड आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याप्रकरणी आ. राजेंद्र गावित यांचे सुपुत्र रोहित गावित यांना न्यायालयाने शनि. १२ सप्टें. रोजी झालेल्या सुनावणीत १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. सुनावणी दरम्यान २ रे सह दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्रीमती पी.एस.जी चाळकर यांनी जमावाच्या हिंसक वर्तनावर आणि दबावाच्या राजकारणावर कडक शब्दांत ताशेरे ओढले.*
*“ एकत्र येण्याच्या अधिकाराचा गैरवापर करत हिंसाचार माजवणे आणि दबावतंत्राचा अवलंब करणे हे लोकशाहीच्या तत्त्वांविरोधात आहे,” असे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी आदेशात नमूद केले आहे. जमावाचा रोष आणि दहशत किती भयंकर असते, हे केवळ त्याला सामोरे गेलेली व्यक्तीच जाणू शकते, अशी टिप्पणीही न्यायालयाने केली. रुग्णालयात इतक्या मोठ्या संख्येने जाण्याचे कोणतेही वाजवी कारण नव्हते, असे स्पष्ट करत ‘ तुम्ही महिला आहात म्हणून सोडले,’ अशी धमकी महिला डॉक्टरांना देणे आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या जमावाला मूक पाठिंबा देणे, बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने स्पष्ट करत यावेळी चांगलेच फटकारले. राजकीय पदांसोबत जबाबदारीही येते, असे सांगत आरोपीचा तपास यंत्रणेवर प्रभाव पडू नये, यासाठी कोठडी आवश्यक ठरवली. अलीकडच्या काळात राजकीय नेते,पदाधिकारी व कार्यकर्त्याकडून सरकारी अधिकारी, डॉक्टर्स व हॉस्पिटल कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. महिन्यापूर्वी डोंबिवली येथील नगरसेवक रमेश म्हात्रे व यांच्या सहकाऱ्याकडून डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना झालेली मारहाण व त्यानंतर पालघरमध्ये घडलेले हे प्रकरण लक्षात घेऊन न्यायालयाने या दोन्ही प्रकरणी घेतलेल्या भूमिकेबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. कायदा हातात घेणाऱ्या या लोकांना कायद्याची जरब बसायलाच हवी. त्यामुळे अशा अपप्रवृत्तीच्या लोकांना सहजासहजी जामीन मिळता कामा नये, असे नागरिकांचे म्हणणे आहे.*

