वाडा प्रतिनिधी,
बससेवा झाली सुरू,मात्र रस्त्याची समस्या ” जैसे थे,”
तालुक्यातील कळंभे ग्रामपंचायत क्षेत्रातील निशेत या पाड्याकडे जाण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला आहे.हा रस्ता यंदाच्या पावसाळ्यात पूर्णपणे खड्ड्यात गेला असून त्यामुळे बससेवा बंद झाली होती.सदर बससेवा तत्काळ सुरू करण्यात आली,मात्र रस्त्याची समस्या ” जैसे थे,” अशीच असून सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ता दुरुस्ती करण्यास चालढकलपणा करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
कळंभे ग्रामपंचायत हद्दीत निशेत व ठाकूरपाडा असे दोन पाडे आहेत.या पाड्यावर बससेवा होती.मात्र हा रस्ता पावसाळ्यात खड्ड्यात गेला असून रस्त्यावर जागोजागी दोन ते अडीच फुटांचे खड्डे पडले आहेत.त्यामुळे या महामार्गावरील बससेवा बंद करण्यात आली.मात्र रस्त्याच्या दुर्दशेबाबत व शाळेत जाणा-या विद्यार्थाची होणारी चार कि.मी.ची पायपीट या विषयी सर्वत्र ओरड झाल्यामुळे एस.टी.प्रशासन खडबडून जागे झाले आणि बससेवा सुरू केली मात्र रस्त्याची दुरवस्था जैसे थे अशीच आहे.
कळंभे निशेत कडे जाणारा हा रस्ता पुढे खर्डी व नाशिक महामार्गाला मिळतो.अहमदाबाद महामार्गावरून वाडामार्गे अनेक जडमालवाहतूक करणारी वाहने नाशिककडे याच मार्गावरून जात असतात. सध्या हा रस्ता खड्ड्यात गेला आहे आणि त्याचा फटका स्थानिक नागरिकांना बसत आहे.
यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग वाडाचे उपअभियंता संजय डोंगरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

